शिवेंद्रराजे, संग्राम व राहुल जगताप हे राष्ट्रवादीतच : पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा टोकाचा गैरवापर भाजप करत आहे. कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती कर्नाटक वेळी दिसली. यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली. संसदीय लोकशाहीला मोठा आघात करण्याची वृ्त्ती दिसते, असा घणाघात त्यांनी केला. 

पुणे :  साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे काल मला भेटले, त्यांनी मला सांगितलं, पक्षाच्या चौकटीबाहेर मी नाही. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप आणि नगरचे आमदार संग्राम जगताप यांचेही फोन आले, तेही पक्षासोबत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे काल माझ्यासोबत हेलिकाॅप्टरमध्ये होते. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे मला भेटायला येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीेचे अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्यावर भाजप दबाव टाकत आहे. अडचणीत सापडलेल्या मोठ्या नेत्यांच्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर भाजपमध्ये येण्यासाठी किंवा निवडणूक लढविण्यासाठी दबाव टाकत आहे, असा आरोप त्यांनी केला. हसन मुश्रीफ यांना भाजपत यावं असं निमंत्रण दिलं, मात्र त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्याच्यावर ED चा छापा पडला, असा दावा त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केला. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा टोकाचा गैरवापर भाजप करत आहे. कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती कर्नाटक वेळी दिसली. यासाठी त्यांनी काही उदाहरणे दिली. संसदीय लोकशाहीला मोठा आघात करण्याची वृ्त्ती दिसते, असा घणाघात त्यांनी केला. 

रासपचे आमदार राहुल कुल यांना भीमा पाटसच्या बाबतीत मदत करुन इच्छा असो किंवा नसो मात्र त्यांना (कुल) लोकसभा निवडणूक लढवायला लावली, असे उदाहरण त्यांनी यासाठी दिले. सोलापूरचे कल्याणराव काळे यांचा कारखाना अडचणीत होता. आम्हाला मदत करणं शक्य नव्हतं. मात्र त्यांना राज्य सरकारने नियम सोडून मदत केली आणि त्यांना भाजपमध्ये घेतलं. इडी, सीबीआय, एसीबी यांचा वापर लोकप्रतिनिधी यांना धमकवण्यासाठी केला जातोय. राज्य सरकार हे राज्य बॅंकेच्या मार्फत नेत्यांना पक्षांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

राष्ट्रवादीचे दुसरे नेतेे छगन भुजबळ यांच्यावर खटला भरला, तुरुंगात टाकलं. त्यांच्यावर झोपडपट्टीच्या जागेवर TDR दिला आणि त्याऐवजी महाराष्ट्र सदन बांधून घेतलं हा आरोप होता. भुजबळ यांनी उत्तम महाराष्ट्र सदन बांधलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथं बैठका घेतात. उत्तम  वास्तू. यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून एकही पैसा गेला नाही. तरीही त्यांनी तुरुंगात टाकलं, अशी टिका त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar clears about ShivendraRaje Sangram jagtap and Rahul Jagtap