राष्ट्रवादीच सक्षम पर्याय - चित्रा वाघ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिंचवड येथे केले. 

पिंपरी - सत्तेमध्ये असलेल्या भाजपचे खरे स्वरूप गेल्या चार वर्षांत दिसून आले आहे. भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार जनतेने केला आहे. जनतेला हवा असलेला सक्षम पर्याय राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. शेतकरी आत्महत्या करत असले तरी सत्ताधाऱ्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चिंचवड येथे केले. 

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाऊसाहेब भोईर मित्र परिवारातर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कला नाट्य व संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी वाघ बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विशाल काळभोर आदी उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या, ‘‘शहरात अत्याचार, गुन्हेगारी वाढत आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणा, महिला आयोग, महिला व बालविकास मंत्रीही असंवेदनशील आहेत. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यातील पक्षाची ताकद ओळखून प्रत्येकाने पक्षाचे हात मजबूत केले पाहिजेत. काम दुपटीने करा आणि राज्यात पुन्हा राष्ट्रवादीचा आवाज घुमवा.’’   

पाटील म्हणाले, ‘‘देशात आणि राज्यात सध्या दोन्ही ठिकाणी आपण सत्तेच्या बाहेर आहोत. अशा परिस्थितीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.’’

महोत्सवाच्या पहिल्या सत्रामध्ये महिलांसाठी ‘मिसेस क्‍लिओपात्रा’ सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. पवार यांच्या समवेत ५० वर्षांहून अधिक कालखंड सामाजिक व राजकीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच रंगभूमी गाजविलेल्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाचा प्रयोग सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भोईर यांनी प्रास्ताविक केले. दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. फजल शेख यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP is a Enabled Option Chitra Wagh