Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीचे इच्छुक अस्वस्थ

Ncp
Ncp

विधानसभा 
पुणे - अजित पवारांचा अनपेक्षित राजीनामा, शरद पवारांची पत्रकार परिषद; त्यानंतर पुन्हा अजित पवारांची पत्रकार परिषद... या सगळ्या घटनांमुळे अस्वस्थ झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीसाठीचे इच्छुक आणि कार्यकर्त्यांचे डोळे आता शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील २१ जागांच्या उमेदवारीकडे लागले आहेत. येत्या दोन दिवसांत काँग्रेसबरोबरील आघाडीची घोषणा होऊन राष्ट्रवादीचे शहर जिल्ह्यातील उमेदवार जाहीर होतील, असा शहर पदाधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा हा अगदी अलिकडच्या काळापर्यंत बालेकिल्ला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे सतत पुण्यात वास्तव्य असते. त्यामुळे पुणे हे पक्षाचे हेडक्वार्टर समजले जाते. साहेब, दादा आणि ताई यांना मानणारे येथे अनेक कार्यकर्ते अन्‌ लोकप्रतिनिधीही आहेत. सत्तेची अनेक पदे किंवा निवडणुकीची उमेदवारी देताना दादांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला. पण, पक्ष किंवा नेतृत्वाने वेगळाच निर्णय घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातूनच दादांमधील अस्वस्थता अनेकदा दिसून आली. अलिकडच्या काळात ती वाढत गेली. दादांना मानणारा गट दादांच्या खुलशानंतर आणखीनच अस्वस्थ झाला आहे. पक्षाने संधी दिली नाही, तर कार्यकर्ते बंडखोरी करू शकतात. मात्र, दादा तसे काही करू शकत नाहीत. त्यामुळे अलिकडे त्यांची पक्षांतर्गत घुसमट वाढलेली आहे, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. साहेबांना मानणारे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्तेही प्रचंड अस्वस्थ आहेत. दादांचा साहेबांवर विश्वास संपला आहे का? अशी विचारणा ते करीत आहेत. ताईंचा गट शहरात अस्तित्वात आहे. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे तो गटदेखील अस्वस्थ आहे. सध्या मात्र या कार्यकर्त्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

या सगळ्या प्रकारात विधानसभा निवडणूक लढविण्यासाठीचे इच्छुक सर्वाधिक अस्वस्थ झाले आहेत. शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडच्या मिळून २१ जागा आहेत. शहरातील तीन आणि जिल्ह्यातील चार जागा काँग्रेस, तर राष्ट्रवादी १४ जागा लढवेल, असे जवळपास निश्‍चित झाले असले; तरी त्याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. येत्या दोन दिवसांत ती होईल, असा पदाधिकाऱ्यांचा होरा आहे.

पुणे शहरातील हडपसर, खडकवासला, वडगाव शेरी आणि पर्वती या जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे आमचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत उमेदवार जाहीर होतील, अशी शक्‍यता आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरले जातील. संघटनात्मक पातळीवर शहरात तयारी पूर्ण झाली आहे.
- चेतन तुपे,  शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com