esakal | पुण्यात कोरोना निर्बंध 'जैसे थे'; अजित पवारांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

उपमुख्ममंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. कोरोना निर्बंधांसंबंधात आज पुण्यात बैठक पार पडली होती. त्यामुळे ते काय घोषणा करतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

पुण्यात कोरोना निर्बंध 'जैसे थे'; अजित पवारांची माहिती

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात निर्बंध 'जैसे थे'च राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोरोना उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, पुणे शहर पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात काही भागात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात सध्या जे निर्बंध लागू आहेत तेच कायम ठेवण्यात आले आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकाने उघडता येतील. शनिवार, रविवारी वीकेंडला अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहतील.

कोरोनाबाधित रुग्णांचे गृह विलगीकरण न करता संस्थात्मक विलगीकरण झाले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्यांच्या घरात स्वतंत्र खोल्या, बाथरूम नाहीत, त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे. उद्योगांनी कामगारांना लसीचे दोन्ही डोस देऊन उद्योग सुरू करावेत.

एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केली. परंतु कुणी आत्महत्या करावी असे सरकारला वाटते का ? अलीकडच्या काळात आत्महत्या झाली की त्याला सरकारला जबाबदार धरले जाते. नेमके कारण पण बघितले पाहिजे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यास निर्बंध शिथिल करण्यात येतील.

हेही वाचा: महाराष्ट्रातील रुग्णवाढ देशासाठी चिंतेचा विषय- पंतप्रधान

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक पूजा करतील. वारकरी संप्रदायाचे आभार मानतो त्यांनी सहकार्य केले. यावेळी वारीसाठी निर्बंधात थोडी सूट देण्यात आली होती. आपल्या परंपरा टिकवण्याचा आपण प्रयत्न करुया. बकरी ईदसाठी मागच्या वर्षीप्रमाणे धोरण कायम असेल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. आतापर्यंत म्हणावा तसा पाऊल पडला नाही. धरणं भरलेली नाहीत, खडकवासला, वरसगाव टेमघर 30 ते 40 टक्के भरले आहेत. धरणं भरल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे थोडीशी चिंता आहे, असंही ते म्हणाले.

बकरी ईदबाबत गतवर्षीचेच धोरण :

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बकरी ईदबाबत गतवर्षी जे धोरण होते, त्यानुसार निर्बंध यावर्षीही कायम राहतील.

समाविष्ट गावांचा डीपी कोणीही करा पण तो उत्तम असावा :

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा (डीपी) कोणी तयार करायचा याबाबत दोन मतप्रवाह आहे. पीएमआरडीए असो किंवा महापालिका कोणीही आराखडा तयार केला तरी तो उत्तम असावा. कुणाची जमीन आरक्षित करायची, कुणाची बाहेर काढायची, यापेक्षा नियोजनबद्ध सोयी- सुविधा उपलब्ध होतील, याला प्राधान्य असावे. महापालिकेत यासंदर्भात ठराव केला असल्यास लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे.

मॉल सुरू करण्याबाबत विचार करू :

कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता सध्या मॉल बंद ठेवण्यात आले आहेत. मॉलमध्ये एखादा व्यक्ती काही खरेदी करायला गेल्यास तो सर्वत्र फिरत बसतो. त्यामुळे मॉल सुरू करण्यास परवानगी नाही. तथापि लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मॉलमध्ये प्रवेश देता येईल का, याबाबत विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

विमानतळासाठी जागा निश्चित नाही :

पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी पुरंदर तालुक्यात जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर विमानतळासाठी अन्य ठिकाणी जागेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. परंतु विमानतळाबाबत अद्याप जागा निश्चित झालेली नाही. जागा निश्चित झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सांगू, असे पवार यांनी नमूद केले.

झोटिंग समितीचा अहवाल प्राप्त नाही :

भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी झोटिंग समितीने अद्याप सरकारकडे अहवाल दिलेला नाही. यासंदर्भात आलेल्या प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत असे पवार यांनी सांगितले.

मुंबईतील मोनोरेल प्रकल्पाला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही, ही बाब खरी आहे. परंतु हा प्रकल्प खासगी संस्थेकडे चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

loading image