पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

पुणे - भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर राज्यात विविध ठिकाणी पडळकर यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान, याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणावर सध्या स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते पुण्यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी आले होते. 

शरद पवारांवर कऱण्यात आलेल्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांचा पुतळा जाळून निषेध केला. पुण्यात शुक्रवारी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. बैठकीनंतर शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. यावर पवार म्हणाले की, मला बोलायचं आहे पण सध्या यावर बोलणार नाही पुन्हा कधीतरी सविस्तर बोलेन असं म्हणत प्रश्नाला बगल दिली. 

हे वाचा - लॉकाडाउन संदर्भात मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा; वाचा सविस्तर बातमी

पडळकरांविरुद्ध तक्रार दाखल दाखल
शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली.  भाजपने विधान परिषदेवर निवडून आणलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी चर्चेची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.

निषेधार्थ पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. महर्षी कर्वे पुतळा चौक, कोथरुड येथे  पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून जाहिर निषेध करण्यात आला. याशिवाय राज्यात इतर ठिकाणीही आंदोलन करून पडळकरांचा निषेध करण्यात आला. 

आणखी वाचा - पुण्यातल्या मोठ्या संस्थेने चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकलाय!

शिवसेनेच्या आमदारांनी भाजपला सुनावले
10 दिवसांचा आमदार 60 वर्षांची संसदीय कारकीर्द असणाऱ्या नेत्याबद्दल बोलतो. सत्तेचा माज किती असावा त्याचे आमदार गोपीचंद पडळकर हे उत्तम उदाहरण आहे. हे केवळ निषेधार्ह नाही तर चुकीचे आहे. अशावेळी पक्ष नेतृत्त्वाला आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. जनतेला उत्तर द्यावे लागेल, अशा शब्दात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपच्या पक्ष नेतृत्वालाही सुनावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar reaction on mla padalkars comment about him