Sharad Pawar: अन् शरद पवार यांच्या डोळ्यात आलं पाणी; काय होता तो किस्सा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar: अन् शरद पवार यांच्या डोळ्यात आलं पाणी; काय होता तो किस्सा?

Sharad Pawar: अन् शरद पवार यांच्या डोळ्यात आलं पाणी; काय होता तो किस्सा?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचे किस्से ऐकले असतील किंवा वाचले असतील. पवार आणि शिंदे दोघांची मैत्री राजकारणाच्या पलिकडील आहे. आज बऱ्याच दिवसांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे पुण्यात एकाच व्यासपीठावर होते. यावेळी शरद पवार यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या मैत्रीसंदर्भातच आज शरद पवारांनी एक किस्साही सांगितलाय.

पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या सांगण्यावरुन पोलीस खात्यातली नोकरी सोडली होती. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असं आश्वासनही दिलं होतं. पण मी तेव्हा त्यांना तिकीट मिळवून देऊ शकलो नाही, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं, असं शरद पवार म्हणालेत. मी त्यावेळी सरकारमध्ये गृहमंत्री झालो होतो.

सुशीलकुमार शिंदे हे कायद्याचे पदवीधर असल्यामुळे मी त्यांना सरकारी वकील बनवले होते. आपल्या ज्या केसेस असतील तर त्या शिंदे यांना द्यायचे ठरले. त्यापुढील निवडणुकीत शिंदेंना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर त्यांनी मागे बघून पाहिल नाही, हा किस्सा शरद पवार यांनी यावेळी सांगितला आहे. पुणे नवरात्र महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा 'महर्षी' पुरस्कार यावर्षी सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार शिदे यांना देण्यात आला आहे.

कार्यक्रमानंतर बोलताना शरद पवार यांनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चालवलं गेलं. या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्यातले जबाबदार लोक आहे. त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकायला हवीत. आणि ही पावलं टाकण्याची जबाबदारी आम्हा लोकांसारख्या सिनियर लोकांवर असेल, त्यापेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे. यातून अपेक्षा अशी करूया की, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल असंही शरद पवार म्हणालेत.