'दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार उदासीन'

युनूस तांबोळी
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची टीका; कवठे येमाईला राष्ट्रवादीचा मेळावा

टाकळी हाजी (पुणे): केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला भुलविण्याचे राजकारण केले. यांच्या काळात शेतमाल व दुधाचे बाजारभाव पडले, साखर उद्योग अडचणीत आला. कंपन्या डबघाईला आल्याने तरुणांचा रोजगार हिरावला गेला. राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने पिण्याचे पाणी उपलब्ध करणे व चारा छावण्या सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडे लक्ष देण्यास भाजप व शिवसेनेच्या आमदारांना वेळ मिळत नसल्याची टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथे आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंबेगाव - शिरूर मतदारसंघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, विश्वास कोहकडे, केशरताई पवार, डॉ. वर्षा शिवले, वैशाली नागवडे, सुनीता गावडे, सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर, अरुणा घोडे, संगीता शेवाळे, सविता पऱ्हाड, प्रदीप वळसे पाटील, भास्कर पुंडे, सदाअण्णा पवार, बाळासाहेब भोर, शरद जांभूळकर, सचिन घोटपुले, सुभाष उमाप, सुदाम इचके, रंगनाथ थोरात, डी. बी. धुमाळ आदी उपस्थित होते.
 
दिलीप वळसे पाटील म्हणाले, की नोटाबंदीसारखा निर्णय चुकीचा ठरला. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या तरी भ्रष्टाचारमुक्त भारत व जनतेच्या खात्यात 15 लाख रुपये आलेले नाहीत. पाबळ व मलठण येथील ग्रामीण रुग्णालय तयार झाले असून, सरकारने तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करू द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.

मानसिंग पाचुंदकर यांनी 39 गावांसाठीची कार्यकारिणी जाहीर केली. प्रास्ताविक राजेंद्र गावडे यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले.

खासदारांनी लेखाजोखा मांडावा...
शिवसेनेच्या खासदारांनी या परिसरातील रेल्वे व विमानतळ घालविला, त्यामुळे तरुणांच्या हातून रोजगाराच्या अनेक संधी निसटल्या. संसदेत प्रश्न उपस्थित केल्याच्या वल्गना करून जनतेला भुलवू नये. मतदारसंघासाठी किती प्रश्न मार्गी लावले याचा लेखाजोखा सादर करावा, असे आव्हानही त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp meeting at kawthe yemai drought and dilip walse patil