Vidhan Sabha 2019 : आ. भरणेंना दणका; पक्षातूनच उमेदवारीला विरोध

Indapur
Indapur

विधानसभा 2019 : इंदापूर(पुणे) : इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांना पुन्हा तिकीट देण्यास तालुका नेते व कार्यकर्त्यांनी विरोध करून भाकरी फिरविण्याची मागणी केली. तालुक्‍यास पाणी देण्यात आमदार भरणे अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर स्वकीयांनीच ठेवला.

आमदार भरणे तुम्ही सर्व पदे भोगली असून, तुम्ही थांबून इतरांना संधी द्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी अप्पासाहेब जगदाळे, माजी तालुकाध्यक्ष अशोक घोगरे, रामभाऊ पाटील यांनी चार दिवसांत उमेदवार नाव निश्‍चित करावे, अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्या अध्यक्षतेखाली सराटी (ता. इंदापूर) येथील जिजामाता विद्यालय प्रांगणात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही मागणी करण्यात आली, त्यामुळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. या वेळी राष्ट्रवादीकडून आमदारकीसाठी इच्छुक चार जणांनी अप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीस पाठिंबा देत पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असल्याचे सांगितले. मेळाव्यास आमदार भरणे, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने अनुपस्थित होते.

छत्रपती कारखान्याचे माजी अयक्ष बाळासाहेब घोलप म्हणाले, छत्रपती कारखाना विस्तारीकरण रखडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. भरणे यांना सर्व राजकीय पदे मिळाली. मात्र, तालुक्‍याचा विकास झाला नाही.'' या वेळी संजयसिंह निंबाळकर, गणेश झगडे, भाऊसाहेब सपकळ, विठ्ठल ननवरे, शशिकांत तरंगे, छाया पडसळकर, प्रभाकर खाडे, ढोले गुरुजी, प्रदीप मोरे, दत्तात्रेय बाबर, शोभना कांबळे यांची भाषणे झाली. या वेळी जगन्नाथ मोरे, कांतिलाल जामदार, प्रदीप जगदाळे, श्रीकांत दंडवते, किसनराव जावळे, अनिल बागल, अशोक चोरमले, कालिदास देवकर उपस्थित होते.

सन 2009 व 2014 मध्ये पक्षासोबत काम केल्याने उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. पक्षाचा पहिला आमदार, खरेदी- विक्री संघ व कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आपण एकजुटीने विजय मिळवला. मात्र नीरा, भीमा नदी, शेटफळ हवेली तलावात पाणी न आल्याने अर्थकारण ठप्प झाले. बंधारे दुरुस्ती नाही, स्वयंचलित दरवाजे नाहीत, युवा पिढीस काम नाही, त्यामुळे तालुक्‍यास दिलदार, जनतेचे प्रश्न सोडवणारा आमदार पाहिजे.

अप्पासाहेब जगदाळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना पाडण्यासाठी आपण भरणे यांना उमेदवारी दिली. प्रथम आपला पराभव झाला. मात्र, नंतर इतिहास घडून भरणे आमदार झाले. मात्र, त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले. ज्या ग्रामपंचायतींना निधी दिला, तेथे पक्षाचा झेंडा फडकला नाही, पाणी प्रश्न सुटला नाही.
अशोक घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com