Election Results : पुणे जिल्ह्यात दोन जागा जिंकूनही राष्ट्रवादीला धक्का 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यातील चारपैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असली, तरी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पराभूत होत असल्यामुळे, पक्षाला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची पुणे शहर मतदारसंघात विजयाकडे वाटचाल सुरू आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी होत असून, त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्याविरुद्ध निर्णायक एक लाख 55 हजार मतांची आघाडी घेतली आहे. लगतच्या शिरुर मतदारसंघात मात्र तीनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मात्र पराभूत व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसने तेथे अभिनेते अमोल कोल्हे यांना उमेदवारी देत वेगळी खेळी केली. त्यात त्यांना यश आले. कोल्हे 58 हजार 829 मतांनी आघाडीवर असून, शिरूरमधील शेवटच्या फेरीची मतमोजणी व्हायची आहे. 

मावळ मतदारसंघात मात्र शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी खडतर ठरलेली निवडणूक खेचून आणली. त्यांनी पार्थ पवार यांच्याविरुद्ध दोन लाख 16 मतांची निर्णायक आघाडी घेतली. त्यांच्यापाठीमागे भाजपचे कार्यकर्ते एकदिलाने उभे आहेत किंवा कसे, याबाबत मतदारसंघात चर्चा रंगली होती, मात्र निकालामुळे युतीत मतभेद नसल्याचे दिसून आले. पुणे जिल्ह्यात पवार यांच्या कुटुंबियांतील सदस्याचा हा पहिलाच पराभव ठरला आहे. या तीन जागांचे निकाल जाहीर होण्याची औपचारिकता बाकी आहे. 

पुण्यात गिरीश बापट यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यावर दोन लाख 14 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसने ईव्हीएम यंत्रांबाबत आक्षेप नोंदविल्याने, मतमोजणीला काही काळ विलंब झाला. मतदारसंघात आतापर्यंत सहा लाख 40 हजार मतांची मोजणी झाली असून, झालेल्या मतमोजणीत बापट यांना 61 टक्के मते, तर जोशी यांना 29 टक्के मते मिळाली. पुण्यात एकूण दहा लाख 34 हजार मतदान झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP shock after wining only two seats in pune district