राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी

राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी

पुणे - धनकवडी परिसरातील ३८, ३९ आणि ४० प्रभागांत बहुतांशी लढती रंगतदार झाल्या. मतांची विभागणी, क्रॉस व्होटिंग यामुळे काही ठिकाणी राष्ट्रवादीला, तर काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला. शिवसेना-भाजप युती तुटल्याने भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्कारावा लागला. या प्रभागांत राष्ट्रवादीची सरशी झाली असली, तरी पक्षाच्या उमेदवारांना पडलेली मते ही पक्षाला विचार करायला लावणारी आहेत.

प्रभाग ३८ मधील अ गटात राष्ट्रवादीचे दत्तात्रेय धनकवडे आणि भाजपचे दिगंबर डवरी यांच्यात लढत झाली. सहावी फेरी वगळता पहिल्या फेरीपासून धनकवडे यांची आघाडी कायम होती. त्यांचा पाच हचार ७६४ मतांनी विजय झाला. क गटातील विजयी उमेदवार भाजपच्या राणी भोसले यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली खुटवड यांना जोरदार लढत दिली. केवळ ५९४ मतांनी भोसले यांना विजयश्री मिळाली. शिवसेनेच्या दीपाली ओसवाल यांनी आठ हजार मतांची बेगमी केली. त्यांनी मिळविलेल्या मतांचा फायदा हा राष्ट्रवादीला झाला. क गटातही भाजप आणि राष्ट्रवादी हेच पक्ष आमनेसामने होते. पाचव्या फेरीत राष्ट्रवादीच्या मनीषा मोहिते आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्‍चित धरून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

गुलालही उधळला; पण इकडे मतदान केंद्रात उर्वरित दोन फेऱ्यांची आकडेवारी जाहीर केल्यानंतर त्यात भाजपच्या मनीषा कदम २४४ मतांनी विजयी घोषित करण्यात आल्या. एकूण सहा उमेदवार रिंगणात होते.

त्यातील दोन उमेदवारांनी सहाशे मते, तर शिवसेनेच्या उमेदवाराने ४ हजार आणि मनसेच्या शकुंतला मोरे यांनी सात हजार मते घेतली. या विभागणीचा फटका राष्ट्रवादीला बसला. ड गटात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सरळ लढत झाली. राष्ट्रवादीच्या प्रकाश कदम यांनी भाजपच्या विनय कदम यांच्यावर सात हजार मतांनी मात दिली.

प्रभाग ३९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी तीन, तर भाजपने एक जागा मिळविली. अ गटात भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे किशोर धनकवडे यांच्यात लढत झाली. पहिल्या तीन फेऱ्यांत धनकवडे यांचा विजय निश्‍चित झाला होता. तापकीर यांचा सात हजार मतांनी दारुण पराभव झाला. ब गटात पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या असलेल्या परंतु भाजपच्या तिकिटावर लढलेल्या मोहिनी देवकर यांचा राष्ट्रवादीच्या तरुण उमेदवार अश्‍विनी भागवत यांनी चारशे मतांनी पराभव केला.

शिवसेनेच्या निकिता पवार यांनी घेतलेल्या सुमारे चार हजार मतांमुळे भाजपला फटका बसला. क गटात भाजपच्या वर्षा तापकीर या दीड हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या; परंतु शिवसेनेचा उमेदवार स्वतंत्र लढल्याने त्यांचे मताधिक्‍य कमी झाले. राष्ट्रवादीच्या श्रद्धा परांडे यांनी दहा हजार ४८६ मते मिळवत जोरदार लढत दिली. ड गटात भाजपच्या गणेश भिंताडे यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे विशाल तांबे विजयी झाले. शिवसेनेचे सुनील खेडेकर यांनी सहा हजार २०० मते घेतली. ही विभागणी भिंताडे यांनाच नुकसानीची ठरली. भाजप-शिवसेनेची युती तटल्याचे आणि ‘नोटा’ या पर्यायाचा वापर याचे परिणाम तिन्ही प्रभागांत दिसून आले.

प्रभाग ४० मध्ये वेगळे चित्र होते. ड गटात मतदानापूर्वी भाजप-राष्ट्रवादीमध्ये लढत होईल, असे वाटत असताना प्रत्यक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे आणि भाजपचे अभिजित कदम यांच्यात चुरस झाली. मोरे यांचा २८३ मतांनी निसटता विजय झाला. इथेही शिवसेनेच्या स्वतंत्र उमेदवाराचा फटका भाजपलाच बसला. अ गटातही तेच झाले.

शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी भाजपची घोडदौड रोखली. याचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याने या पक्षाचे युवराज बेलदरे हे सुमारे तीन हजार मतांनी विजयी झाले. ब गटात राष्ट्रवादीच्या अमृता बाबर या साडेपाच हजार मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या स्वप्नाली जाधव यांना पराभव पत्कारावा लागला. या गटात मनसेच्या दीपाली काकडे यांनी ५ हजार १९० एवढी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. क गटात नगरसेवक असलेल्या कल्पना थोरवे यांना चौथ्या क्रमांकाची मते पडली. मनसेच्या सारिका फाटे यांनी सात हजार मते घेतली. शिवसेना-मनसे यांनी मिळून अकरा हजार मते घेतली. या विभागणीत राष्ट्रवादीच्या स्मिता कोंढरे यांच्याकडून भाजपच्या सुनीता लिपाणे यांचा ५२२ मतांनी पराभव झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com