esakal | "एकच वादा अजितदादा...' 
sakal

बोलून बातमी शोधा

"एकच वादा अजितदादा...' 

माळेगाव कारखान्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यशाचे खरे शिल्पकार अजित पवार हेच असल्याची प्रतिक्रिया संभाजी होळकर, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप व सचिन सातव यांनी दिली.

"एकच वादा अजितदादा...' 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माळेगाव - माळेगाव साखर कारखान्यामध्ये सत्ता खेचून आणल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत मोठा जल्लोश केला. गुलाल उधळून आणि फटाक्‍यांची आतषबाजी करीत उमेदवारांसह अनेकांनी आनंद साजरा केला. "एकच वादा अजितदादा...' या घोषणेने मतमोजणी केंद्राचा परिसर दुमदुमून गेला होता. 

मतमोजणीचा कल जसजसा राष्ट्रवादीच्या दिशेने झुकू लागला, तसतसा राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला. 28 तासांहून अधिक काळ मतमोजणी सुरू असूनही कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. निकाल हाती येत होते, तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. "राष्ट्रवादी पुन्हा' या गीतावर कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरच ठेका धरत नाचही केला; तर अनेकांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. काही उत्साही कार्यकर्ते व उमेदवार निकालानंतर थेट अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले. 

माळेगाव कारखान्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यशाचे खरे शिल्पकार अजित पवार हेच असल्याची प्रतिक्रिया संभाजी होळकर, बाळासाहेब तावरे, केशवराव जगताप व सचिन सातव यांनी दिली. तसेच, या विजयात तिसऱ्या आघाडीचे नेते रामदास आटोळे, अविनाश देवकाते, हर्शल कोकरे, ऍड. राहुल तावरे, अविनाश गोफणे, विलास देवकाते यांचा सिंहाचा वाटा आहे, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत. 

माळेगाव कारखान्याच्या सभासदांनी दाखविलेल्या विश्‍वासाला पात्र राहून एक आदर्श कारखाना बनविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक मंडळ करेल. चांगला ऊस दर देण्याचे दिलेले आश्‍वासनही पूर्ण करणार आहे. संचालक मंडळ पूर्ण विचारांचे आलेले नसले; तरी पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांना मतदारांनी पसंती दिली. या कारखान्याला राज्यस्तरावर जी मदत लागेल ती पवारसाहेब व मी करणार आहे. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री 

माळेगाव कारखान्याच्या शेतकऱ्यांची सेवा प्रामाणिकपणे केली. अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर केला. पैशाचा वारेमाप वाटप व दहशतीच्या बळावर सत्ता मिळविली. त्यांना चार दिवस तालुक्‍यात ठाण मांडून बसावे लागले. त्यांनी विकासाचे मुद्दे प्रचारात न घेता केवळ मतदारांना दमदाटी केली. नोकरीवरून काढून टाकू, कोणाचे पाणी बंद करू, अशा धमक्‍या दिल्या. कारखान्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निवडणूक लादली. 
- रंजन तावरे,  मावळते अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना 

loading image