राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, पुणे जिल्ह्यातील या बड्या नेत्याला कोरोना 

भरत पचंगे / डाॅ. संदेश शहा
Saturday, 25 July 2020

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर व त्यांची पत्नी या दोघांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, दोघांनीही स्वत:ला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करुन घेतले आहे. 

शिक्रापूर/इंदापूर (पुणे) : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर व त्यांची पत्नी या दोघांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, दोघांनीही स्वत:ला पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करुन घेतले आहे. 

पुणे झेडपीच्या सभापतींना कोरोनाची लागण

पुणे जिल्ह्यातील सर्वात बलशाली, आक्रमक व कार्यकर्त्यांच्या मोठया जाळ्याचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी असलेल्या प्रदीप गारटकर यांचा दिनक्रम पक्षकार्यक्रमांमुळे गेल्या काही दिवसांपासून पूर्ण व्यग्र होता. जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांशी सतत संवाद- समन्वय ठेवण्याचे काम गारटकर करत होते. मात्र, काल त्यांनी दिलेल्या स्वॅब तपासणीचे रिपोर्ट आज प्रात्प झाले. त्यानुसार त्यांचा स्वत:चा व पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे गारटकर दांपत्य सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले आहेत. 

सावधान, वापरलेले मास्क रस्त्यावर टाकताय

आम्हा दोघांचीही तब्बेत सध्या उत्तम असून, केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्ही दाखल झाल्याची माहिती स्वत: गारटकर यांनी दिली. कोरोनाकाळात गरिब- गरजू, बेरोजगारांसाठी मदतीचा हात म्हणून गारटकरांचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरू होते. या शिवाय होमग्राऊंड असलेल्या इंदापूर तालुक्यात ते राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमवेत, तर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत सातत्याने दौऱ्यात सहभागी होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप व कोरोनासदृश्य लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांनी पत्नीसमवेत दोघांचाही स्वॅब तपासणीसाठी दिला होता. याचा रिपोर्ट आज प्राप्त होताच ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. गेल्या काही दिवसांत त्यांचा ज्यांच्याशी जवळून संपर्क आला, त्यांच्या बाबतही आरोग्य विभागाला त्यांनी कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's Pune district president Garatkar's corona report is positive