Vidhan Sabha 2019 : भाजपला टक्कर देणार राष्ट्रवादीची 'युवा ब्रिगेड' 

संभाजी पाटील 
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

- टिंगरे, दोडके, तुपे, अश्‍विनी कदम रिंगणात उतरल्याने वाढली चुरस 

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यास टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने पुण्यातील विधानसभेची लढत आता रंगतदार होणार आहे. पर्वतीमधून नगरसेविका अश्‍विनी कदम, वडगावशेरीतून नगरसेवक सुनील टिंगरे, हडपसरमधून चेतन तुपे, खडकवासल्यातून नगरसेवक सचिन दोडके या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. कोथरूड मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्‍यता असल्याने या ठिकाणचा उमेदवार पक्षाने जाहीर केला नाही. 

राष्ट्रवादी कॉंग्रसेच्या यादीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. या यादीत हडपसरचे चेतन तुपे वगळता इतर तीनही ठिकाणी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. वडगावशेरीत सुनील टिंगरे यांनी 2014 मध्ये शिवसेनच्यावतीने निवडणूक लढविली होती. विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांना त्यांनी चांगली टक्कर दिली होती. टिंगरे हे महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. टिंगरे आणि माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यात नुकतीच दिलजमाई करण्यात आली होती. त्यामुळे टिंगरे हे मुळीक यांना या निवडणुकीतही काटे की टक्कर देतील. वडगावशेरी मतदारसंघात भाजप एकतर्फी निवडणूक जिंकेल, अशी शक्‍यता आता उरलेली नाही. 
तुपे यांनी 2014 मध्ये योगेश टिळेकर यांच्याविरूद्ध निवडणूक लढविली होती. मात्र ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते. तुपे हे राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष आहेत. हडपसरमध्ये मनसेच्यावतीने नगरसेवक वसंत मोरे हेही रिंगणात असल्याने हडपरची लढतही लक्षवेधी ठरणार आहे.

Vidhan Sabha 2019 : भुजबळ, आव्हाड, रोहित पवारांसह निष्ठावंत चेहऱ्यांना संधी 

पर्वती मतदारसंघासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील होता. पण ही जागा राखण्यात राष्ट्रवादीला यश आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपेक्षेप्रमाणे याठिकाणी नगरसेविका अश्‍विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पर्वतीत दोन महिलांमध्ये टक्कर होणार आहे. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ याठिकाणी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. कदम या तिसऱ्यांदा नगरसेविका झाल्या असून, स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. कदम या विधानसभेच्या दृष्टीने गेली वर्षभरापासून तयारी करीत होत्या. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पर्वतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. पण कदम यांच्या उमेदवारीने या मतदारसंघातही उत्सुकता वाढली आहे. 

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

खडकवासला मतदारसंघात युवा नगरसेवक सचिन दोडके उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. दोडके हे गेली दोन वर्षांपासून विधानसभेची तयारी करीत होते. दोडके हे सलग दुसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत. महापालिका निवडणुकीत संपूर्ण शहरात भाजपचे वातावरण असताना दोडके यांनी आपल्या प्रभागातील चारही नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासमोर ते चांगले आव्हान उभे करू शकतात. 

कोथरूड मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही. मनसेचे उमेदवार ऍड. किशोर शिंदे यांना आघाडीच्यावतीने पाठिंबा द्यावा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर एकच उमेदवार द्यावा असा प्रयत्न आहे. त्याला उमेदवार जाहीर न करून राष्ट्रवादीने पुष्टी दिली आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांना कोथरूडमध्येही कष्ट घ्यावे लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs Young Brigade will fight with BJP in Maharshtra Vidhan Sabha 2019