तळेगावातील सुरेखाच्या संसाराला छताची गरज

तळेगाव दाभाडे - बनेश्वर स्मशानभूमीलगतचा सुरेखा शिंदे यांचा उघडा संसार.
तळेगाव दाभाडे - बनेश्वर स्मशानभूमीलगतचा सुरेखा शिंदे यांचा उघडा संसार.
Updated on

तळेगाव स्टेशन - गरोदरपणातच पतीने साथ सोडल्यानंतर दशकभरापासून धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सुरेखा शिंदेने सध्या स्मशानभूमीत उघड्यावर संसार थाटला असून कुणी ‘घरं देतं का घर’ अशी भावनिक हाक ती देत आहे. मात्र, अद्याप तिला कोणीच प्रतिसाद दिला नसला तरी तिने जिद्द सोडली नाही. निवेदनाचे गठ्ठे घेऊन ती फिरत आहे. घर मिळाले तर समाजसेवा करून ऋण फेडेल असे ती म्हणते. 

चार वर्षांपूर्वी झोपडी जळाल्यानंतर ती आजतागायत तळेगावच्या बनेश्वर मंदिरामागे स्मशानात संसार करत आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातून १९९७ मध्ये तळेगावात ईगल कंपनीत कामासाठी आली. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हिंदू ढोर समाजातील सुरेखाच्या आई-वडिलांनी पुण्यातील विठ्ठल शिंदे याच्याशी लग्न करून दिले. २००५ ला ईगल कंपनी बंद पडल्यानंतर तिच्या संसाराला घरघर लागली.

रोजगाराविना उपासमार होत असल्याने पती विठ्ठल तिला गरोदर असतानाच दहा वर्षांपूर्वी कामाला जातो, असे सांगून गेला तो अद्याप परतलाच नाही. 

सत्येंद्रराजे दाभाडे यांनी तिला काही वर्षांपूर्वी बनेश्वर स्मशानभूमीलगत झोपडे टाकून राहण्यास जागा दिली. मुलगा श्रीधरसह तिने तेथे संसार थाटला. मात्र, ऑक्‍टोबर २०१६ मध्ये काही नतद्रष्टांनी तिच्या झोपडीला आग लावली. पुन्हा संसार उघड्यावर आला. स्मशानभूमीत बांबू, तळवट लावून भांडीकुंडी ठेवलेल्या संसाराला संरक्षण नाही.

धुणीभांडी करून तिची गुजराण सुरू आहे. मुलगा श्रीधर सध्या तिसरीला नथुभाऊ भेगडे शाळेत आहे. मात्र, घराअभावी तो कडोलकर कॉलनीतील गुरुकुलमधे राहतो. 

झोपडी जळाल्यापासून २५ पेक्षा अधिक वेळा तिने तळेगाव नगर परिषदेत, मंत्रालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात खेटा मारल्या. मात्र, तिला अद्याप न्याय मिळाला नाही. पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस नोंदवून घेत नाहीत. तरीही निवेदनांचे गठ्ठे घेऊन ती फिरतेच आहे. घरासोबतच कागदपत्रे जळाल्याने मुलाच्या शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र मिळत नाही. वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयातून तिला केशरी रंगाची शिधापत्रिका मिळाली. पिवळी शिधापत्रिका नाही, जात दाखला, रहिवासी दाखला नाही. त्यामुळे गरजू आणि आर्थिक दुर्बल असूनही सुरेखाला सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. नगर परिषद रहिवासी दाखला देत नाही.

सुरेखा शिंदे यांना स्वत:चे घर व जागा नसल्याने त्यांना नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवून देता येईल का? याबाबत प्रलंबित आदेश आणि कागदपत्रे तपासून गरजूला घर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com