महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पावले उचलण्याची गरज: डॉ. खांडगे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पिंपरी : "महिला सध्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या हक्कासाठी लढावा लागणारा लढा कायम आहे. समाजात धनदांडग्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रश्‍न मोठे आहेत. जळगाव वासनाकांड, कोठेवाडी, कोपर्डी यासारखी सामूहिक अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत. या महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत योग्य पावले उचलण्याची गरज आहे'', असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंदा खांडगे यांनी केले. 

पिंपरी : "महिला सध्या आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. मात्र, त्यांना आपल्या हक्कासाठी लढावा लागणारा लढा कायम आहे. समाजात धनदांडग्यांच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांचे प्रश्‍न मोठे आहेत. जळगाव वासनाकांड, कोठेवाडी, कोपर्डी यासारखी सामूहिक अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत. या महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत योग्य पावले उचलण्याची गरज आहे'', असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंदा खांडगे यांनी केले. 

रांजणगाव येथील महागणपती मंदिर सभागृहात आयोजित अखिल भारतीय तेराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाचे उद्‌घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात डॉ. खांडगे बोलत होत्या.

स्वानंद महिला संस्था, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स पंचम झोन महिला शाखा व आराध्या फाउंडेशन यांनी हे संमेलन घेतले. जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनलाल चोपडा, महामंत्री प्रा. अशोक पगारिया, राष्ट्रीय महिला अध्यक्षा रुचिरा सुराणा, पारस मोदी, उद्योजक प्रकाश धारिवाल, दिना धारिवाल, माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्‍वास मेहेंदळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती (पुणे जिल्हा परिषद) राणी शेळके, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा स्वाती पाचुंदकर, प्रा. प्रकाश कटारिया, मोहनलाल संचेती आदी उपस्थित होते. 

रांजणगाव येथील मारुती मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी निघाली. महागणपती देवस्थान ट्रस्ट (रांजणगाव), शिरूर नगरपालिका, फियाट इंडिया, स्वरोस्की प्रायव्हेट लिमिटेड, जर्बिल सर्किट इंडिया, मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती आदींना विविध पुरस्काराने गौरविले. "पुणे येथील भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हायला हवे'', अशी मागणी डॉ. खांडगे यांनी केली. 

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची कवी उद्धव कानडे यांनी घेतलेली मुलाखत रंगतदार ठरली. निमंत्रितांच्या कवी संमेलनात ज्येष्ठ कवयित्री प्रा. विमल वाणी, सविता इंगळे, अनिल दीक्षित, दीपेश सुराणा, सुहास घुमरे, कल्पना बंब, सुनीता लुणावत, अनिता नहार, प्रीती सोनवणे, विमल माळी, श्रुती कात्रेला, संभाजी गोरडे यांनी विविध कविता सादर करून रंगत आणली. पुष्पा कोठारी, सूरज शिंगवी, विमल कटारिया, डॉ. अर्चना आंधळे-पाटील, गौरी लागू, आरती चौंधे, वंदना पोटे, कल्पना पठारे, उषा थोरात, साधना साळवे आदींना स्वानंद आदर्श माता व अन्य पुरस्कारांनी गौरविले. प्रा. सुरेखा कटारिया, वर्षा टाटिया, कल्पना कर्नावट, पुष्पा ओस्तवाल, अनुराधा हटकर यांनी संयोजन केले. डॉ. श्‍वेता राठोड, सपना जैन यांनी सूत्रसंचालन केले. सारिका पाचुंदकर यांनी आभार मानले. 

विचार चिरकाल टिकणारे - वळसे-पाटील 
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले, "प्राचीन मराठी भाषेच्या विकासात महिलांचा मोठा वाटा होता. समाजामध्ये 50 टक्के महिलांची संख्या असल्याने त्यांना बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. गोविंद पानसरे, एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्या या बुरसटलेल्या विचारसरणीचे प्रतीक आहे. विचारवंतांच्या हत्या करून विचार संपत नाहीत. काही धर्मांध व्यक्ती व संस्था सध्या पुरोगामी साहित्यिकांवर घाला घालायला निघाले आहेत.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need to take steps to prevent women from oppression: Dr. Khandge