Young Artists : पुण्यातील तीन युवा कलावंतांचा सन्मान ; सारंग, अनुजा, नागेश यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

संगीत नाटक अकादमीतर्फे २०२२ व २०२३ या वर्षांसाठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराची घोषणा झालेल्या ८० कलाकारांपैकी तिघे पुण्यातील आहेत. यासाठी निवडलेले सारंग कुलकर्णी (सरोदवादन), अनुजा झोकरकर (शास्त्रीय गायन) व नागेश आडगावकर (अभंग गायन) हे स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत.
Young Artists
Young Artistssakal

संगीत नाटक अकादमीतर्फे २०२२ व २०२३ या वर्षांसाठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराची घोषणा झालेल्या ८० कलाकारांपैकी तिघे पुण्यातील आहेत. यासाठी निवडलेले सारंग कुलकर्णी (सरोदवादन), अनुजा झोकरकर (शास्त्रीय गायन) व नागेश आडगावकर (अभंग गायन) हे स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. ते तिघेही भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याशी नीला शर्मा यांनी केलेली बातचीत...

प्रश्न : तरुण प्रतिभावंत कलावंत म्हणून नवे प्रयोग करताना परंपरेबाबतचा विचार तू कसा करतोस?

सारंग : घरात माझ्या आधीच्या दोन पिढ्यांचा सांगीतिक वारसा आहे. आजोबांचे थोरले बंधू पं. रघुनाथराव हे पं. विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य होते. आजोबा पं. विनायकराव हे अमृतसरमध्ये गांधर्व महाविद्यालयात विद्यार्थी घडवत होते. वडील पं. राजन यांच्या संगीतसाधनेचे संस्कार माझ्यावर नकळत झाले. बालपणीच त्यांच्याकडून सरोदवादनाचे धडे गिरवू लागलो. पलुस्करांच्या शैलीतील त्यांचे वादन मी अनुसरत गेलो. लहान असताना पं. नारायणराव व्यास व पं. कुमार गंधर्व यांच्या गाण्याची ध्वनिमुद्रणे सतत कानावर पडत. ‘हेच संगीत’ असे मनावर ठसले. त्याचीच मनात खोलवर रुजलेली पाळेमुळे आज मला नवनवे प्रयोग करताना स्फूर्ती देतात. बाबांनी संगीताचा विचार माझ्यापर्यंत पोहोचवला. पाठांतराऐवजी स्वतःचा पाया भक्कम करून नवनिर्मितीसाठी प्रेरित केले. आठ- दहा वर्षांपासून उस्ताद तौफिक यांच्या झेंबेवादन कार्यक्रमांमध्ये मी सरोदवर साथ करतो आहे. यासाठी मी गिटार व सरोद यांच्यातून नवे वाद्य घडवले. फ्युजनमध्ये वाजवतानाही मी पारंपरिक रागांच्या सुरावटींतील मींड, मुरक्या व तानांवर भर देतो.

प्रश्न : ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कल्पना झोकरकर या तुझ्या आई. त्यांच्याकडून तुला संगीताचे बाळकडू मिळाले. आज तू शास्त्रीय, उपशास्त्रीय गाण्यात आश्वासक ठरत आहेस. शिवाय चित्रपटांमध्येही गात आहेस. वारसा आणि तुझे प्रयोग यांचे नाते कसे आहे?

अनुजा : ग्वाल्हेर गायकीचा माझ्यावर प्रभाव आहे. नंतर जयपूर व काही प्रमाणात किराणा घराण्याची छायाही माझ्या सादरीकरणात उमटते. कारण तेही मी खूप ऐकले आहे. आईने असा आग्रह कायम धरला की, आधी परंपरा नीट समजून घे. मग तुला हवे ते बदल तुझ्या प्रस्तुतीत कर. आजवर वेगवेगळ्या पिढ्यांमधील श्रेष्ठ कलावंतांनी संगीतात वेगळी छाप उमटवली असली तरी त्यांनी आधी परंपरेची महती लक्षात घेतली. बुजुर्गांकडून मिळालेल्या विद्येचे मर्म सखोलपणे जाणून घेतले. नंतर स्वतःची वेगळी वाट शोधली, पण त्यात अर्थपूर्णता हवी. मी आजच्या काळात काही नवे करू पाहते आहे, ते शास्त्रीय संगीताची परंपरा राखूनच. पूर्वीच्या काळी तासन्तास मैफली चालत. तसे आता राहिले नाही. कमी वेळात छोटेखानी प्रस्तुती सर्वसामान्यांना आवडते. त्यांना या प्रकारेही चांगले पर्याय उपलब्ध करून देत त्यांचा ओढा शास्त्रीय संगीताकडे ठेवणे, हे माझ्यासारख्यांसमोरील आव्हान आहे.

प्रश्न : अभंगगायनाची गोडी तुला कशी लागली? शास्त्रीय संगीत व लोकपरंपरेतील अभंग गायन यांचा परस्परसंबंध तुझ्या सांगीतिक वाटचालीत कसा आहे?

- नागेश : नांदेड जिल्ह्यातील आडगाव या छोट्याशा गावात मी जन्मलो. कुटुंबात कोणीही शास्त्रीय गायक नाही, परंतु सगळ्यांना भजन, कीर्तन, अभंग आदी ऐकण्याची पुरेपूर आवड. माझ्या मनात भक्तिसंगीत फार बालपणीच रुजले. बाबांचे एक मित्र म्हणाले की, याला रीतसर अभंग गायला शिकवायला हवे. त्यासाठी बाबांनी मला लातूरला पाठवले. तेथे पं. विठ्ठलराव जगताप यांनी मला शास्त्रीय संगीताची तालीम दिली. मी संगीत विशारद होईपर्यंत त्यांच्याकडेच शिकलो. नंतर संगीतात बी. ए. करण्यासाठी पुण्यातील ललित कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. दुसऱ्या वर्षाला असतानाच कोलकाता येथील ख्यातनाम गायक उस्ताद राशीद खाँ यांच्याकडे शिकायची संधी मिळाली.‌ एक वर्ष जाऊन-येऊन व पाच वर्षे सलग तेथे राहून मी त्यांच्याकडून शिकलो. मग पुण्यात परत येऊन भारती विद्यापीठात संगीतात एम. ए. करू लागलो. दरम्यान, देशात व परदेशात विविध मंचांवरून शास्त्रीय, उपशास्त्रीय व भक्तिसंगीत सादर करायला वाव मिळाला. अनेक संतांच्या रचना मी परंपरागत पद्धतीने गातो. कित्येकदा त्यांत निरनिराळ्या रागांवर आधारित विस्तार करताना समाधान लाभते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com