...तोपर्यंत ‘विद्या बाळ पर्व’ सुरूच राहणार

डॉ. नीलम गोऱ्हे
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

विद्याताई आणि मी अनेक ठिकाणी एकत्र जायचो तेव्हा खूप साऱ्या प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागायची.

विद्याताई आणि मी अनेक ठिकाणी एकत्र जायचो तेव्हा खूप साऱ्या प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागायची. खास करून १९७५ नंतरचा म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दशकानंतरचा काळ मला आठवतोय. तेव्हा अनेकविध प्रश्‍नांवर फेरविचार सुरू झाला, चर्चा झडायला लागली. विवाह, कुटुंब, समाजातील स्त्रीचे स्थान, औद्योगीकरण, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या म्हणजे कमावत्या स्त्रिया आणि त्यांचे प्रश्‍न, त्याचे कुटुंबावर होणारे परिणाम असे अनेक मुद्दे पुढे आले. हा विषय ‘स्त्री’ अंकात नेहमी असायचा.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याचबरोबर आणखी एक बिनीचा प्रश्‍न पुढे आला, जो कळीचा मुद्दा बनला आणि तो म्हणजे गृहिणी. लोकांना वाटते की गृहिणींना काही प्रश्‍नच नसतात. घरकाम, मूल वाढविणे, इतर कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्या अशा अनेक आघाड्यांवर ती लढत असते. कालांतराने मुले मोठी होतात, तर पती कामात आणखी व्यस्त होतात. पर्यायाने गृहिणीच्या कामाचा, अस्तित्वाचा आणि एकूणच सन्मानाचा मुद्दा पुढे आला. हे प्रश्‍न सर्वांना पडले. स्त्रीच्या ओळखीचा संघर्ष विद्याताईंनी पुढे आणला. मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीनच नव्हे, तर सर्वच स्त्रियांना तो लागू होता.

‘स्त्री’ मासिकातून त्यांनी या प्रश्‍नाला वाचा फोडली. आभूषणे, सौंदर्यावरील विशेषांक न काढता त्यांनी स्त्रीचा स्वतःच्या शरीरावरचा अधिकार, आरोग्य, तंदुरुस्ती, मानसिकता, आत्मविश्‍वास, तिच्यातील कला, मुलांचे संगोपन, आजार असे विविध विषय हाताळले. त्या जोडीला बदलणारा पुरुष आणि पुरुषाची बदलती भूमिका हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्यावर त्या चिंतन करायच्या. १९८४च्या सुमारास आम्ही ‘स्त्री आधार केंद्र’ सुरू केले. त्याआधी १९८१ मध्ये क्रांतिकारी महिला संघटना स्थापन केली होती. तेव्हा त्या उद्‌घाटनाला आल्या होत्या. त्यांनी मांडलेले विचार सामान्य महिलांना आवडले. पुण्यात अशी संस्था असावी म्हणून आम्ही ‘नारी समता मंच’ स्थापन केला. कालांतराने त्या ‘स्त्री’ मासिकातून बाहेर पडल्या आणि त्यांचे जीवन आणखी संघर्षमय बनले. आम्ही राज्य भरात अनेक दौरे केले व संस्था स्थापन केल्या. स्त्रीचा प्रश्‍न खासगी स्वरूपाचा आहे का, असे विचारले जायचे. तिला बोलके करण्यासाठी ‘बोलत्या व्हा’ केंद्र सुरू करण्यात आले. एकल महिलांचा प्रश्‍न, त्यांचा संघर्ष, व्यथा असे विषयही त्यांनी हाताळले. बलात्कारावर फाशी हेच एकमेव उत्तर असल्याचे त्या मानत नसत. त्या मानवी अधिकाऱ्याच्या भूमिकेतून याकडे पाहायच्या.

पुण्यात मध्यमवर्गीय चौकटीत राहणाऱ्या, स्वभावाने सौम्य असणाऱ्या, पण प्रश्‍न परखडपणे मांडणाऱ्या विद्याताई माझ्या आयुष्यातील सुख-दुःखाच्या क्षणाच्या सोबती राहिल्या. माझी विश्‍वासाची मैत्रीण असेच मी म्हणेन. त्यांच्याशी मी अनेक बाबतीत सल्लामसलत केली. शिवसेनेत गेले तेव्हा मी त्यांचा सल्ला घेतला नव्हता. आम्ही अलीकडे भेटलो तेव्हा आमच्यातील मैत्रीच्या धागा सचेतन असल्याची जाणीव झाली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून आम्ही स्त्री आधार केंद्रात प्रार्थना केली होती. एखादी व्यक्ती गेल्यानंतर ‘पर्व संपले’ असे आपण म्हणतो, पण विद्या बाळ हे पर्व चालू राहणार आहे. स्त्रीयांवरील अत्याचार, आणि विषमता असेपर्यंत ते संपणार नाही!

क्रांतिकारी विचार
 विद्याताईंवर अनेक स्त्रीवादी विचारवंतांचा प्रभाव होता. ज्यांना विश्‍लेषक म्हणता येईल अशा विचारवंतांच्या साहित्याचे वाचन, भारतीय संदर्भात विवाह आणि एकूणच मुद्यांवर त्याचे विवेचन करीत त्यांनी क्रांतिकारी विचार मांडले. महिलांना मंदिर प्रवेशासाठी त्यांनी याचिका सादर केली. महिला स्वच्छतागृह, इच्छामरण असे त्यांच्या प्राधान्याचे विषय होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neelam gorhe article vida bal