'एमबीबीएस' व "बीडीएस'साठी आज "नीट'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

गैरप्रकार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांवर अनेक बंधने

गैरप्रकार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांवर अनेक बंधने
पुणे - खासगी आणि अभिमत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि दंतवैद्यक (बीडीएस) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची परीक्षा (नीट) उद्या (ता. 7) होत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने गैरप्रकार टाळण्यास या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर अनेक बंधने घातली आहेत. सकाळी साडेनऊनंतर परीक्षा केंद्रात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोचायचे आहे.

परीक्षेची वेळ सकाळी दहा ते दुपारी एक अशी आहे. वाहतूक कोंडी, वातावरणातील बदल याचा विचार करून विद्यार्थ्यांनी शक्‍य तितक्‍या लवकर घराबाहेर पडावे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) आणि आधारकार्ड किंवा छायाचित्र असलेले सरकारी कागदपत्र सोबत घेऊन जावे. कपडे कोणते घालावेत, कोणते साहित्य आणू नये, अशा सूचना "सीबीएसई'ने जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना पेनदेखील परीक्षा केंद्रावर मिळणार आहे.

सोबत हे नेऊ नका
पाण्याची बाटली, खाद्यपदार्थ, पेन्सिल, कंपास, पिशवी, कॅल्क्‍युलेटर, पेन, लिहिण्याचे पॅड, मोजपट्टी यांसह कोणतेही शैक्षणिक साहित्य, तसेच मोबाईल, ब्लूटूथ, एअरफोन, हेल्थ बॅंक, ब्रेसलेट, कृपाण, पर्स, लॉकेट, बूट, पूर्ण बाह्यांचे शर्ट, घड्याळ, उन्हापासून बचाव करणारे चष्मे, हेअरपिन, रबरबॅंड, पट्टा, कानातली रिंग, बांगड्यासुद्धा परीक्षा केंद्रात घेऊन जाता येणार नाही. या वस्तू परीक्षा केंद्रात ठेवण्याची व्यवस्थादेखील केलेली नाही. या वस्तू आणल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

असे कपडे घाला
विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेवेळी कपडे कोणते घालावेत याच्याही सूचना सीबीएसईने दिल्या आहेत. स्लिपर, चप्पल, उंची नसलेल्या सॅंडल, हलके हाफ बाह्यांचे शर्ट, सलवार - कुर्ता घालता येईल. मोठ्या बटण असलेल्या कपड्यांवर बंदी आहे. पिन, बिल्ला किंवा इतर कोणतेही चिन्ह शर्टवर नसावे. फुले, प्राण्यांचे चित्र अथवा इतर मजकूर नसावा. कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सीबीएसईने हे नियम बनवले आहेत.

Web Title: neet exam for mbbs & bds