एकाच कुटुंबातील 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; खडकवासला परिसरात कडकडीत बंद

निलेश बोरुडे
गुरुवार, 9 जुलै 2020

मागील तीन ते चार दिवसांमध्ये खडकवासला गावामधील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे.

पुणे : खडकवासला तालुका हवेली येथील कोल्हेवाडी परिसरातील एकाच घरातील आणखी पाच व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खडकवासला गावची एकूण रुग्ण संख्या अवघ्या काही दिवसांमध्ये 34 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी दोन रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून 32 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर वंदना गवळी यांनी दिली. सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ एका नामांकित कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कोल्हेवाडी येथील एका व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्याने कोरोना तपासणी करून घेतली असता त्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातील इतर चार सदस्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले‌. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.वंदना गवळी यांच्याकडून देण्यात आली.

कोरोनाच्या लढाईसाठी भोरमध्ये उभारणार खास हॉस्पिटल

मागील तीन ते चार दिवसांमध्ये खडकवासला गावामधील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार हवेली उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर सचिन बारवकर यांनी संपूर्ण खडकवासला गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार गावातील इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या असून केवळ दवाखाने, मेडिकल सुरू राहणार असून दूध, फळे, भाजीपाला, किराणा अशा अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना सकाळी 10 ते दुपारी 2 याच वेळेत सुरू राहणार आहेत. 

पुण्याच्या महापौरांना डिस्जार्ज

उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी खडकवासला गाव संपूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर आज पासून खडकवासला ग्रामपंचायत हद्दीत सदर आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य म्हणून खडकवासला हद्दीतील व्यावसायिकांनीही उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Five Cases Found In Khadakwasla Pune Total progressive Total Positive cases Reach 34