चिखलीत लवकरच नवीन रुग्णालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पिंपरी - चिखलीतील पाच एकर जागेत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नवीन रुग्णालय उभारण्यात येणार आहे. संबंधित रुग्णालयासाठी तीन एकर जागा ताब्यात आली आहे. उर्वरित दोन एकर जागा ताब्यात आल्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाईल. कासारवाडीला महिनाभरात नवीन दवाखाना सुरू होणार आहे. 

महापालिकेची शहरात आठ रुग्णालये आहेत. सध्या भोसरी, थेरगाव, आकुर्डी येथे नवीन रुग्णालयांची उभारणी सुरू आहे. जिजामाता रुग्णालयाच्या (पिंपरी) पुनर्उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तालेरा रुग्णालयाची (चिंचवडगाव) पुनर्उभारणी केली जात आहे. अजमेरा कॉलनी येथे नेत्र रुग्णालय साकारत आहे. त्या पाठोपाठ आता चिखलीतही रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. 

शहरात महापालिकेचे सध्या २७ दवाखाने आहेत. महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये दवाखाने नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच वर्षांमध्ये तळवडे, चऱ्होली, म्हेत्रे वस्ती, रुपीनगर, पुनावळे, किवळे, दिघी, मोशी, घरकुल (चिखली), बोपखेल आदी ठिकाणी दवाखाने सुरू झाले. कासारवाडीत संदर्भ ग्रंथालयाच्या इमारतीत महिनाभराच्या कालावधीत नवीन दवाखाना सुरू केला जाणार आहे. तेथे नागरिकांसाठी बाह्यरुग्ण विभागाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

महापालिकेतर्फे चिखलीत पूर्ण पाच एकर जागेचा ताबा मिळाल्यानंतर रुग्णालय उभारणीच्या कामाला सुरवात होईल. कासारवाडीला महिनाभरात दवाखाना सुरू केला जाणार आहे. रावेत, डुडुळगाव, ताथवडे या ठिकाणी दवाखान्यांसाठी आवश्‍यक जागेची मागणी भूमी व जिंदगी आणि नगररचना विभागाकडे केली आहे. त्यासाठी जागा मिळाल्यानंतर तिथेही दवाखाना सुरू करण्याचे नियोजन आहे.
- डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

Web Title: New Hospital in Chikhali by Municipal