
पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) चे कर्मचारी व अधिकारी यांचा गेल्या पंधरा दिवसांपासून सूरू असलेला संप आरोग्य विभागाला सोडवण्यात अपयश आल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. संपामुळे सरकारी दवाखान्यांतील नवजात अतिदक्षता कक्ष, प्रसूती विभाग, शस्त्रक्रियागृह, लसीकरण, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांची तपासणी, तसेच मुलांचे व किशोरवयीन लसीकरण कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर बाधित झाला आहे. या संपामध्ये पुण्यातील १४०० तर संपूर्ण महाराष्ट्रातून ३५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून त्यामुळे पुण्यासह राज्यातील आरोग्य सेवा अक्षरशः कोलमडल्या आहेत.