नाइट कॅम्पिंगची वाढती क्रेझ!

सुवर्णा चव्हाण
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - रात्रीचा चंद्र... अन्‌ सोबतीला मोकळं आकाश... चांदण्याचा प्रकाश अन्‌ मित्र-मैत्रिणींसमवेत मनसोक्त गप्पा... हे विलोभनीय वातावरण अनुभवण्यासाठी तरुणाई ‘नाइट कॅम्पिंग’ला निघतेय. लोणावळ्यापासून भीमाशंकरपर्यंत... मुळशीपासून ते पाचगणीपर्यंत... अशा विविध ठिकाणी सध्या तरुण-तरुणींचा नाइट कॅम्पिंगचा ट्रेंड वाढलेला दिसत आहे. 

पुणे - रात्रीचा चंद्र... अन्‌ सोबतीला मोकळं आकाश... चांदण्याचा प्रकाश अन्‌ मित्र-मैत्रिणींसमवेत मनसोक्त गप्पा... हे विलोभनीय वातावरण अनुभवण्यासाठी तरुणाई ‘नाइट कॅम्पिंग’ला निघतेय. लोणावळ्यापासून भीमाशंकरपर्यंत... मुळशीपासून ते पाचगणीपर्यंत... अशा विविध ठिकाणी सध्या तरुण-तरुणींचा नाइट कॅम्पिंगचा ट्रेंड वाढलेला दिसत आहे. 

महाविद्यालयांना सध्या सुट्या असल्याने ‘नाइट कॅम्पिंग’ची क्रेझ दिसत आहे. रात्रीचा प्रवास, गडकिल्ल्यांवर रात्रीची भटकंती, टेंट कॅम्पिंग तसेच फूड पार्टीची मेजवानी, कॅम्प फायर आणि मग रात्रीच्या कॅम्पिंगमध्ये रंगलेल्या गप्पा अन्‌ निसर्ग असे निराळे वातावरण तरुणांना अनुभवता येत आहे. विविध ट्रेकर्स संस्थांतर्फे हे नाइट कॅम्प आयोजित केले जात आहेत. त्याचा खर्च ठिकाण व सोयीसुविधांनुसार ८०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. कॅम्पिंगसाठी येण्या-जाण्याच्या सुविधेसह टेंट आणि इतर साहित्यही पुरविले जाते. त्याशिवाय रात्रीचे जेवणही मिळते. कॅम्पिंगच्या तारखा आधीच ठरलेल्या असतात. त्यानुसार नियोजन होते. 

विविध ट्रेकर्स ग्रुपतर्फे आयोजित ‘नाइट कॅम्पिंग’ची माहिती सोशल मीडियावर दिली जाते. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळासह फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲपद्वारे कॅम्पिंगची प्रसिद्धी करण्यात येते. त्यानुसार ऑनलाइन बुकिंग केले जात असून, याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

नाइट कॅम्पिंगची ठिकाणे
नाइट कॅम्पिंगसाठी पवना लेक, सांधन व्हॅली, लोणावळा, मुळशी, खोपोली, भिगवण, भीमाशंकर, महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, भंडारदरा, लवासा, मुरुड, वेल्हे, भोर अशा विविध ठिकाणांना पसंती मिळत आहे. तसेच, गडकिल्ल्यांवर कॅम्पिंगलाही मोठा प्रतिसाद आहे.

काजवा फेस्टिव्हल आणि स्टार गेझिंगला पसंती
पावसाळ्याच्या आधी रात्री काजवे दिसून येतात. ते पाहण्यासाठी खास काजवा फेस्टिव्हल आयोजित केला जात आहे. त्यालाही पसंती मिळत असून, हा कॅम्पिंगचा एक भाग बनला आहे. तसेच, निवांत ठिकाणी रात्रीच्या चांदण्या पाहण्याचा एक अनुभव मिळावा, यासाठी स्टार गेझिंगलाही पसंती आहे.

उन्हाळ्यात नाइट कॅम्पिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १२ ते ५५ वयोगटातील व्यक्ती कॅम्पिंगसाठी येत असून, तरुणांमध्ये याची क्रेझ अधिक आहे. आम्ही दरवर्षी असे कॅम्प आयोजित करतो. विशेषतः काजवा फेस्टिव्हलला अधिक पसंती मिळत आहे. भंडारदरा, सांधन व्हॅली, राजमाची, भोरगिरी आणि कोंढाणा आदी ठिकाणच्या कॅम्पला लोक येत आहेत. एक वेगळा अनुभव आणि वातावरण याकडे कल वाढला आहे.
- वैभव पिंपळकर, समन्वयक, ट्रेकर्स ग्रुप

मी कॅम्पिंगसाठी नेहमी जातो. त्याचा अनुभव काही औरच असतो. भटकंतीसह मित्र-मैत्रिणींबरोबर निवांत वेळ घालवता येतो आणि वेगळ्या ठिकाणी फिरण्याचा आनंद मिळतो.
- मयांक शहा

Web Title: night campaign craze