Fight With Coronavirus : पुणेकरांसाठी मोठी बातमी; गेल्या 48 तासांत कोरोनाचे रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

राज्यातील कोरोनाचे पाहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले होते. दुबई येथे सहलीला गेलेल्या 40 जणांपैकी हे एक दांपत्य होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 9 मार्चला निदान झाले होते.

पुणे : महाराष्ट्रात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण सापडण्याची सुरवात झालेल्या पुण्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण गेल्या 48 तासांत सापडला नसल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुण्यात सर्वप्रथम लागण झालेल्या दाम्पत्यासह पाच जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचे पाहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले होते. दुबई येथे सहलीला गेलेल्या 40 जणांपैकी हे एक दांपत्य होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 9 मार्चला निदान झाले होते. होळीच्या दिवशी त्यांना महापालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची स्पष्ट लक्षणे त्यांना दिसत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांना यश मिळाले आहे. ते आता पूर्णतः बरे झाल्याचा निर्वाळा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. त्यानंतर त्या दाम्पत्याची मुलगी, कार चालक आणि त्यांच्यासंपर्कात आलेल्या तिघांनाही घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यातून आतापर्यंत पाच जण कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापौर मोहोळ यांनी ट्विट करत म्हटले आहे, की पुणे शहरात ४८ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही. पुण्याच्या हद्दीत गेल्या ४८ तासांत एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात २४ तासांत ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधील एक सहप्रवासी यांचा यात समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no coronavirus patient last 48 hours in Pune says mayor Murlidhar Mohol