मार्केट यार्ड बंदचा संभ्रम कायम; बैठकीत तोडगा नाहीच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केट यार्डात मोठी गर्दी होते.  त्यामुळे व्यापारी, अडते आणि कामगार संघटनांनी बंदचा निर्णय घेतला आहे. 

मार्केट यार्ड - राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये म्हणून त्या चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु तरही मार्केट यार्ड बंद करण्याचा निर्णय दि पूना मर्चंटस् चेंबर, अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी घेतला आहे. यामुळेच शहरासह उपनगरात भाजीपाला तुटवडा निर्माण होत आहे. तुटवड्यामुळे भाव कडाडले आहेत. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ बैठकांचे सत्र सुरू आहे. यात अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शहरातील ग्राहकांमध्ये सम्रंभ निर्माण होऊन ग्राहक मिळेल त्या भावात भाजीपाला खरेदी करत असल्याचे चित्र आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजीपाला खरेदी करण्यासाठी मार्केट यार्डात मोठी गर्दी होते. यावर अद्याप कोणताही अंकुश नाही. त्यामुळे व्यापारी, अडते आणि कामगार संघटनांनी बंदचा निर्णय घेतला आहे. गर्दीमुळे कोरोना विषाणूचा मोठा धोका आहे. या भीती पोटी कामगारांना घरातूनच सोडले जात नसल्याची माहिती काही कामगार संघटनांनी दिली. तसेच जे कामगार कामावर येऊ शकतात त्यांना वाटेत पोलिसांकडून अडवले जात आहे. त्यामुळे बाजारात कामगारच उपलब्ध होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

व्यापारी म्हणाले, ज्या भावात माल आले त्या भावात माल द्यायला आम्ही तयार आहोत. आम्हाला सध्या फायद्या तोट्याची चिंता नाही, ग्राहकांच्या गरजेच्या काळात मदतीचा हात द्यायचा आहे. काही लोक गरजेपेक्षा दुप्पट माल खरेदी करतात त्यामुळे गरजू लोकांसाठी मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक व्यापारी अशा संकटाच्या काळात आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे. ही आपत्ती या पिढीतल्या व्यापाऱ्यांच्या आयुष्यातली सगळ्यात कठीण आपत्ती आहे. तरीही यावर तोडगा म्हणून बाजार समिती व्यवस्थापनाने माल उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. केवळ बैठका घेऊन हा प्रश्न संपणारा नाही. 

- गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गुड न्यूज; देशातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त

आम्ही धान्याचा कुठेही तुटवडा निर्माण होऊ देणार नाही. फक्त ग्राहकांनी एकावेळी गर्दी करून मालाची मागणी करू नये, घाबरून न जाता सगळ्या ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी आम्ही कार्यशील आहोत. फक्त यामध्ये प्रशासनाने योग्य ते सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी जे. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
चौकट

शहरात भाजीपाला विक्री केंद्रे उभा करावी

प्रशासनाने भाजीपाल्याचे विकेंद्रीकरण करावे. शहरात विविध ठिकाणी भाजीपल्याची केंद्रे उभा करावीत. मार्केट यार्डातून गाड्या त्या ठिकाणी पाठवाव्यात. त्यामुळे ग्राहकांची मार्केट यार्डात येणारी गर्दी कमी होईल. असेही मार्केट यार्डातील काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखविले.

किरकोळ दुकानदारांनी बाजारात न येता फोन वरून ऑर्डर द्यावी. तसेच त्यांना वाहनाद्वारे माल पोहच केला जाईल.तसे च ज्या दुकानदाराकडे स्वतःचे वाहन आहे त्यांनी ओळखपत्र घेऊन स्वतः मार्केट यार्डात यावे. त्यांना पोलिसांनी सहकार्य करावे.

मार्केट यार्ड चालू ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या उपाययोजना १. सर्व कामगारांना ओळखपत्र द्यावे.
२. गर्दीमुळे पोलिसांकडून सध्या दुकाने बंद करण्याचा दबाव येत आहे. याबाबत पोलिसांनी सहकार्य करून गर्दी कमी करण्यासाठी मदत करावी.
३. मार्केट यार्डातील प्रत्येक गेटवर एक पोलिस आणि बाजार समिती कर्मचारी उभा करावे. खरेदीदार असेल तरच आत सोडावे.
४. बाजारात टप्या टप्प्याने खरेदीदारांना आत सोडावे.
५. व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे दररोज येणाऱ्या खरेदीदारांना ओळखपत्र द्यावे.
६. मार्केट यार्डात आतमध्ये सोडताना निर्जंतुकीकरण करूनच सोडावे.
७. दुकानदारांनी माल देताना एक मीटरचे अंतर ठेवण्याच्या पट्ट्या अखाव्यात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no decision about market yard