esakal | पुणे : फी नाही, तर परीक्षा नाही! कोथरूडमधील प्रकार

बोलून बातमी शोधा

Exam

पुणे : फी नाही, तर परीक्षा नाही! कोथरूडमधील प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड - ‘शालेय फी ची थकीत रक्कम भरल्याशिवाय आपले पाल्य कोणत्याही प्रकारच्या पेपर तपासणीकरिता पात्र राहणार नाही, याची नोंद घ्यावी’ अशी सूचना पालकांना दिल्यानंतरही ज्यांनी फी भरली नाही अशा पालकांच्या पाल्यांना ऑनलाइन परिक्षेची संधी नाकारण्यात आल्याची घटना कोथरूडमध्ये घडली. ‘मित्राने परीक्षा दिली मी का नाही देवू शकत’ असे रडवल्या चेहऱ्याने विचारणाऱ्या मुलांना काय उत्तर द्यायचे, या विचाराने हळव्या झालेल्या पालकांनी ‘सकाळ’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोरोना महामारीमुळे संसार मेटाकुटीला आला आहे. रोजच्या जगण्याची लढाई सुरू असताना मुलांची शिक्षणाची इच्छा पुरी करू शकत नसल्याची खंत वाटत आहे. शिक्षण संस्थांनी फीसाठी तगादा लावला आहे. फी भरू शकलो नाही म्हणून मुलाला परीक्षेस बसू दिले नाही. मुलामध्ये नाकारलेपणाची भावना निर्माण झाली आहे, आता आम्ही काय करावे, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला.

हेही वाचा: तरूणाचा अनोखा विक्रम; सोळा वेळेस रक्तदान आणि आता प्लाझ्मा दान

सागर जाधव हे पालक म्हणाले की, शाळेची फी ३१ हजार पाचशे रुपये आहे. पैकी वीस हजार रुपये भरले आहेत. उर्वरितपण भरणार आहोत, पण आता पैसेच नाहीत, उधारही कोणी देत नाही. त्यामुळे संस्थेने सहकार्य करावे अशी अपेक्षा होती.

एक महिला पालक म्हणाल्या की, मी एकल पालक आहे. माझ्या मुलीला खूप शिकवायची इच्छा आहे, परंतु आता कोरोनामुळे मी सुद्धा हतबल झाले आहे. त्यातच फी नाही म्हणून मुलीला परिक्षेस बसू दिले नाही. यासर्व घटनेमुळे मला निराश वाटत आहे.

महेश विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष सचिन मंत्री म्हणाले की, १५ टक्के पालकांनी फी भरलेली नाही. ३५ टक्के पालकांनी निम्मी फी भरली आहे. शाळेकडे सुमारे पंचावन्न टक्के फी जमा झाली आहे. २१ मे ला आम्ही पुन्हा ऑनलाइन परीक्षा घेणार आहोत. त्यावेळी ज्यांनी फी भरली असेल अशा विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. मुख्याध्यापिका अश्विनी मुजुमदार म्हणाल्या की, पालकांना दहा टप्प्यात फी भरायचीसुद्धा संधी दिली होती. वर्ष संपलेय तरीसुद्धा अनेकांची फी आलेली नाही. या परीक्षेचा मुलांच्या शिक्षणावर काहीही परिणाम होणार नाही. फी भरल्यावर या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल.