esakal | किरकटवाडीतील नाकाबंदी केवळ नावापुरतीच!

बोलून बातमी शोधा

Pune Police ( संग्रहित छायचित्र)
किरकटवाडीतील नाकाबंदी केवळ नावापुरतीच!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आलेले पोलिस व होमगार्ड यांच्याकडून रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची विचारपूस केली जात नाही. यामुळे परिसरात नाकाबंदी केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कामाशिवाय नागरिकांना घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, किरकटवाडी परिसरात रस्त्यांवर फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून विचारपूस होत नाही. यामुळे अनेक जण कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत परिसरात मुक्त संचार करत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका आहे.

हेही वाचा: पुण्यात भाजप नगरसेवकाची दमदाटी; महिला अधिकाऱ्याला कोसळले रडू

परिसरात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या गावांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड, किरकटवाडी व खडकवासला ही गावे प्रशासनाकडून हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत. सध्या नांदेड येथे १२२, किरकटवाडी ७७, तर खडकवासला येथे ६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मागील आठवड्यात पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या गावांना भेट घेऊन नाकाबंदी कडक करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

नांदेड फाटा, किरकटवाडी फाटा, कोल्हेवाडी फाटा, खडकवासला धरण चौक या ठिकाणी हवेली पोलिस ठाण्याकडून नाकाबंदीसाठी पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तैनात असलेले पोलिस एका बाजूला बसून मोबाईलमध्ये व्यस्त असतात. कोण येते आणि कोण जाते, याकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचा उपयोग परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राऊंडबाबत जाते ‘खबर’

पोलिस ठाण्यातून अधिकाऱ्यांची राऊंडची गाडी निघाली, की सर्व नाकाबंदीच्या ठिकाणी ताबडतोब याबाबत ‘खबर’ पोचते. त्यानंतर मोबाईलमध्ये व्यस्त असलेले पोलिस व होमगार्ड पटकन ‘सावध’ होऊन गाडी येण्याच्या वेळी उभे असतात. त्यानंतर अधिकारी निघून गेल्यावर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मी स्वतः फिरून नाकाबंदी व्यवस्थित करण्याबाबत सूचना देत आहे. ठरवून दिलेल्या ठिकाणी जे पोलिस कर्मचारी किंवा होमगार्ड आढळून येत नाहीत त्यांची नोंद पोलिस ठाण्याच्या डायरीत घेतली जात आहे.

-राहुल आवारे, पोलिस उपअधीक्षक