ना लॅब; ना वेटिंग, कोरोना रिपोर्ट ताबडतोब! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona
ना लॅब; ना वेटिंग, कोरोना रिपोर्ट ताबडतोब!

ना लॅब; ना वेटिंग, कोरोना रिपोर्ट ताबडतोब!

पुणे - तुम्हाला कोरोना (Corona) झालाय की नाही या तणावात तुम्ही किमान सहा ते आठ तास घालवता ना? स्वॅब (Swab) ते रिपोर्ट (Report) या दरम्यान रुग्ण (Patient) प्रचंड मानसिक ताणातून जातो, हे आपल्या बहुतांश जणांचा असाच अनुभव आहे. पण, आता तुमचे कोरोना निदान अवघ्या ४० मिनिटांमध्ये होणार आहे. त्यामुळे ना लॅब; ना वेटिंग, रिपोर्ट ताबडतोब! ‘माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन’ने हे ‘कोव्हिस्विप्ट’ (Coviswift) हे ‘पॉइंट ऑफ केअर सोल्यूशन कोरोना निदानाची यंत्रणा विकसित केली आहे.

पुण्याने कोरोनाचे दोन भयंकर उद्रेक अनुभवले आहेत. शहरातील बहुतांश प्रत्येकाने गेल्या २२ महिन्यांमध्ये कधी न कधी कोरोना निदान चाचणी केली आहे. कोणी प्रयोगशाळेत जाऊन केली असेल, कोणी प्रयोगशाळा तंत्रज्ञाला घरी बोलावून स्वॅब दिला असेल. किंवा महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन कोरोना निदान चाचणी केली असेल. पण, या कोणत्याही यंत्रणेतून तुम्हाला सहा ते आठ तासांच्या आत निश्चित कोरोना निदानाचा रिपोर्ट मिळाले नसेल. हे सहा ते आठ तास तुमच्या मनावर किती दडपण होतं? कोरोना झाल्यावर कॉरंटाइन कुठे व्हायचं, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हायचं का, कोणत्या अजून एखाद्या डॉक्टरांचे ‘सेकंड ओपिनियन’ घ्यायचे का, असे कितीतरी प्रश्नचिन्ह एकाच वेळी मनात काहूर घालत होते. हे सगळं आता थांबणार आहे. कारण, अवघ्या ४० मिनिटांत तुम्हाला कोरोना संसर्ग झाला की, नाही हे अचूकपणे कळणार आहे.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ५ हजार ८५० नवीन कोरोना रुग्ण; १२ जणांचा मृत्यू

आतापर्यंत वापरलेले तंत्र

आतापर्यंत प्रयोगशाळेशिवाय निश्चित कोरोना निदान चाचणी करता येत नव्हती. त्यासाठी मोठी जागा आवश्यक असते. त्यासाठी तंत्रज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. ‘आरटी-पीसीआर’ चाचणीसाठी आवश्यक घटक उणे २० अंश सेल्सिअसमध्ये साठवावे लागतात. त्यांची वाहतूकही त्याच पद्धतीने करावी लागते. त्या आधारावर रुग्णाच्या घशातील स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवायचे. तेथे ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करायची. त्याचा रिपोर्ट येण्यासाठी किमान सहा ते आठ तास लागतात.

पुण्यात विकसित झालेली ‘कोव्हिस्विप्ट’ ही जगातील सर्वाधिक जलद गतीने होणारी अचूक निदान रॅपीड टेस्ट आहे. जेमतेम चाळीस मिनिटांमध्ये १६ रुग्णांचे नमुने यात तपासता येतात. विमानतळ, रुग्णालय, ग्रामीण भागांमध्ये अशा सर्व ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येतो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ लागत नाही.

- हसमुख रावळ, व्यवस्थापकीय संचालक, मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन

‘कोव्हिस्विप्ट’ कसे आहे?

  • कोव्हिस्विप्टसाठी शितसाखळीची (कोल्ड चेन) व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मोठे फ्रिजर्स, त्याची वाहतूक हा त्रास यातून कमी होतो.

  • टोस्टरच्या आकारातील एक छोटे मशिन विकसित केले आहे. त्यात कोरोना निदान चाचणी यशस्वी होते.

  • विजेवर चालणाऱ्या या मशिनमध्ये रुग्णाचा कोरोना नमुना तपासण्यासाठी देण्याची व्यवस्था केली आहे.

  • त्यातून ४० मिनिटांमध्ये कोरोनाचे अचूक निदान होते.

निदान चाचणीत काय झाला बदल?

  • मोठ्या प्रयोगशाळेची गरज नाही.

  • शितसाळखी कालबाह्य झाली.

  • मोठ्या प्रमाणात किट साठवणूक करण्याची आवश्यकता नाही.

टॅग्स :CoronavirusPune News