सुरक्षारक्षक नसलेले एटीएम टार्गेट 

संदीप घिसे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही एटीएम सेंटर लुटण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही एटीएम सेंटर लुटण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामुळे एटीएम सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पिंपरी- चिंचवड शहराच्या हद्दीत 571 एटीएम सेंटर आहेत. यापैकी अवघ्या पाच टक्‍के एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक आहेत. बहुतांश एटीएम सेंटरमध्ये सीसी कॅमेरे आहेत. मात्र, त्यापैकी काही सीसी कॅमेरे बंद आहेत. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असल्याने त्याचा तपासात काहीही फायदा होत नाही. काही एटीएम सेंटरमध्ये रात्री लाइटही नसते. येथील सीसी कॅमेऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. 

यापूर्वीही घडल्या घटना 
आठ वर्षांपूर्वी कासारवाडीतील युनियन बॅंकेचे एटीएम मशिनच चोरून नेले होते. याप्रकरणी विजय चारी यांच्यासह तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली होती. रफिक शेख यालाही चाकण परिसरात एटीएममध्ये चोरी केल्याप्रकरणी अटक झाली होती. आठ महिन्यांपूर्वी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या चिंचवड आणि सांगवी येथील एटीएममधून बनावट चावीचा वापर करून लाखो रुपये चोरून नेले. या गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. दीड महिन्यापूर्वी संभाजीनगर येथील एटीएम मशिन गॅस कटरने कापताना जळून खाक झाले होते. अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न पाषाण रोड परिसरातही झाला होता, तर काही दिवसांपूर्वी एटीएम सेंटरमधून बॅटऱ्या चोरीस जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. 

बॅंकेसोबतच ग्राहकांनाही फटका 
सहा महिन्यांपूर्वी शहरातील एटीएम सेंटरमधून कार्डांचे क्‍लोनिंग करून इतर राज्यांतून बनावट कार्डच्या आधारे पैसे काढण्यात आले होते. या सेंटरवर सुरक्षारक्षक असते तर असा प्रकार घडलाच नसता. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्यानेही लुटण्याचे प्रकार एटीएम सेंटरमध्ये होतात. 

बॅंकांच्या खर्चात वाढ 
सुरक्षारक्षकांना द्यावा लागणारा पगार व त्यांच्यासाठी करावी लागणारी व्यवस्था, एटीएमसाठी आवश्‍यक वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यामुळे बॅंकांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत गेल्या दीड-दोन वर्षांत एटीएममधून बॅंकांना मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे खर्चातून बचत करण्याचा एक भाग म्हणून एटीएमची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली आहे, असे एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. 

विम्यामुळे सुरक्षेकडे दुर्लक्ष 
काही बॅंकांनी एटीएम मशिनचे काम खासगी पद्धतीने दिले आहे. यामुळे एटीएममध्ये चोरी किंवा इतर काही अडचण आल्यास त्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर राहणार आहे. संबंधित कंपन्या एटीएमचा विमा काढल्याने सुरक्षारक्षक व इतर आवश्‍यक बाबींकडे दुर्लक्ष करतात. विमा देताना अद्ययावत सीसी कॅमेरे आणि सुरक्षारक्षक अनिवार्य केल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला. 

पोलिस ठाणे एटीएम सेंटर 
पिंपरी 58 
चिंचवड 25 
निगडी 35 
भोसरी 40 
एमआयडीसी भोसरी 37 
सांगवी 32 
वाकड 200 
हिंजवडी 88 
चिखली 32 
दिघी 24 

Web Title: Non-protective ATM targets in PCMC