उत्तर महाराष्ट्रात पाऊस

उत्तर महाराष्ट्रात पाऊस
Published on

उत्तर महाराष्ट्रात पावसाची हजेरी

प्रतीक्षा कायम : शेतकऱ्यांच्या पेरणीबाबतच्या आशा पल्लवीत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. २२ : उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ठिकठिकाणी आज पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा आदी भागांत, धुळ्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांत काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप हंगामाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मालेगाव भागात पाऊस

मालेगाव : शहरासह कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. बहुतांश भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे. काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. वातावरणातील उकाडा कमी झाला आहे.

देवळा तालुक्यात हजेरी

देवळा : दीर्घ प्रतीक्षेनंतर देवळा तालुक्यात सोमवारी पहिल्या पावसाचे आगमन झाले. पावसाच्या सरी बरसताच शेतकरी आणि नागरिकांनी पावसात भिजत आनंद व्यक्त केला. मात्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरीप पेरण्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम असल्याने शेतकऱ्यांची नजर अद्याप आभाळाकडेच लागून आहे.

भावडबारीत दरड कोसळली

देवळा : येथील विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर भावडबारी घाटात आज साडेचारच्या दरम्यान पहिल्याच पावसात दरडीचा काही भाग कोसळल्याने काळ वाहतूक खोळंबली होती. सुदैवाने जीवित व वित्तहानी झाली नाही. गेल्या काही दिवसांपासून भावडबारी घाटाचे रुंदीकरणाचे काम चालू असून लोखंडी संरक्षक जाळी डोंगराच्या भोवती न बसवल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे.

शिरपूरला थोडा दिलासा

शिरपूर : शहर व परिसरात सोमवारी (ता. २२) दुपारी पावसाने हजेरी लावली. ऊन आणि दमट वातावरणामुळे त्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, पेरणीसाठी अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन पाणी खोलवर झिरपणे गरजेचे आहे. त्याशिवाय पेरणी करता येणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

सोनगीर परिसरात पाऊस
सोनगीर : परिसरात पावसाचे आगमन झाले. मात्र, अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने हिरमोड झाला. कडक ऊन व उकाड्यातून सुटका होण्यास मदत झाली असली, तरी केवळ अर्धा तास पावसामुळे शेती व विहिरीसाठी उपयोग नाही. पेरणीसाठी दोन- तीन वेळा जोरदार पाऊस होण्याची गरज आहे. पिंपळनेरमधील गणपती चौक, टपाल कार्यालयासमोर रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी दादासाहेब रामराम पाटील बँकेखाली असलेल्या एका दुकानात शिरले. यामुळे व्यावसायिक गणेश जगताप यांच्या फर्निचरचे मोठे नुकसान झाले.

जळगावला तुरळक पाऊस

जळगाव : जिल्ह्यात उन्‍हाचा तडाखा कायम आहे. सोमवारी (ता. २२) सकाळपासून ढगाळ वातावरण होते. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. दुपारी साडेतीननंतर जळगाव शहरासह काही भागात पावसाचे आगमन झाले. मात्र, पेरणीयोग्‍य पाऊस नसल्‍याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभर ऊन-सावल्‍यांचा खेळ सुरू राहिल्‍यानंतर दुपारी साडेतीनच्‍या सुमारास शहरासह आजूबाजूच्‍या परिसरात तुरळक पाऊस झाला.


भंडाऱ्यात महिला, २३ जनावरे मृत्युमुखी

भंडारा : तुमसर तालुक्यात सोमवारी तीन गावांत वीज काेसळून एका महिलेसह २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेचे नाव भीमलता भोजराम उचिबगले (वय ५०, रा. लोहारा) असे आहे. सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह जिल्ह्यात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. या यावेळी तुससर तालुक्यातील लोहारा शिवारात वीज कोसळून शेतात काम करत असलेल्याली भीमलता यांचा मृत्यू झाला. तसेच याच तालुक्यातील देवनारा शिवाराज वीज कोसळून २२ शेळ्या व एका म्हशीचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com