सोने खरेदी नाहीच; अक्षय तृतीयेचा मुहूर्तही हुकला!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

मागील कित्येक वर्षांत प्रथमच गुढीपाडव्यापाठोपाठ अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील सोने खरेदीचा लोकांचा मुहूर्त हुकला आहे.

पिंपरी : मागील कित्येक वर्षांत प्रथमच गुढीपाडव्यापाठोपाठ अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील सोने खरेदीचा लोकांचा मुहूर्त हुकला आहे. लॉकडाऊन उठल्यावर ३ ते ४ महिन्यांनी परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकेल, अशी आशा सराफी बाजार पेठेमधून व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुमारे महिन्याभरापासून लॉकडाऊन लागू असल्याने लग्नसराई आणि गुंतवणूकीसाठी सोने खरेदी पूर्णपणे थंडावली आहे. गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे दोन्ही शुभमुहूर्त असून त्यानिमित्ताने लोकांकडून हमखास सोने खरेदी केली जाते. मात्र, यंदा प्रथमच गुढीपाडव्या पाठोपाठ लोकांचा अक्षय तृतीयेचाही सोने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे. 

पिंपरी चिंचवड सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सोनिगरा म्हणाले, "लॉकडाऊनपूर्वी काहीसे मंदीचे वातावरण होते. मात्र, सोन्याचे भाव चढते राहिले तरी मध्यमवर्गाचा लग्न सराईसाठी तसेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे कल होता. अडचणीच्या वेळेस जमिनीपेक्षा सोनेच तत्काळ उपयोगी पडत असल्याने लोक आवर्जून सोने खरेदी करतात. मात्र, मागील कित्येक वर्षांत प्रथमच गुढीपाडवा, अक्षय तृतीया यासारख्या सणांच्या दिवशी सराफ बाजार बंद राहिला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकार काही उद्योग-व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याच्या विचारात आहे. राज्य सरकार देखील त्यावर निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. सध्या ३ मेपर्यंत घरात थांबण्याची मानसिक तयारी लोकांनी केली आहे. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील रूग्णांची नवीन वाढती संख्या पाहता लॉकडाऊन उठण्याबाबत साशंकता वाटते.

राज्यातील काही भागांत ३ मेनंतर लॉकडाऊन मागे घेण्यात आला तरी उद्योग-व्यवसाय बंद राहिल्याने लोकांच्या हातात पैसे दिसणार नाहीत. त्यामुळे, लॉकडाऊन उठविल्यावर देखील बाजारपेठ पूर्व पदावर येण्यासाठी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असेही सोनिगरा यांनी सांगितले. 

सोन्याची झळाळी कायम

देशभरात लॉकडाऊन चालू असला तरीही सोन्याच्या भावात चढउतार कायम आहे. शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव अंदाजे ४६ हजार ५०० रूपये तर २२ कॅरेटचे भाव ४४ हजार ५०० रूपये प्रतितोळा इतके राहिले. चांदीचे भाव स्थिर असून, ४२ हजार रुपये प्रतिकिलो असा चांदीचा भाव राहिल्याचे रमेश सोनिगरा यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not buying and Selling of Gold in Festival in Pune