‘साऱ्याजणीं’च्या ‘मैतरणी’चा निरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

वैचारिक जागरण आणि चळवळींच्या माध्यमातून स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या विद्या बाळ (वय ८४) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात कन्या डॉ. विनीता तसेच यशोधन आणि अनिकेत हे पुत्र आहेत. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन
पुणे - वैचारिक जागरण आणि चळवळींच्या माध्यमातून स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आयुष्यभर झगडणाऱ्या विद्या बाळ (वय ८४) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात कन्या डॉ. विनीता तसेच यशोधन आणि अनिकेत हे पुत्र आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्याताई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर दोन महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.   

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, अनिल अवचट यांच्यासह सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते, अभ्यासक, कलावंत आणि लेखक यांनी प्रभात रस्ता येथील ‘नचिकेत’ या निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर विद्याताईंच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महाराष्ट्रात स्त्री मुक्‍तीसाठी झालेल्या सामाजिक चळवळीशी ‘विद्या बाळ’ हे नाव अभिन्नपणे जोडले गेले आहे. ‘स्त्री’ मासिकाच्या संपादनात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी ‘मिळून साऱ्याजणी’ मासिक सुरू करून, त्याद्वारे स्त्री-पुरुष समतेचा विचार तर  सतत मांडलाच; पण तो एकूण सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे, याचीही जाणीव ठेवली. या मासिकात त्यांचे ‘मैतरणी गं.. मैतरणी’ हे गाजलेले सदर असे. नर्मदा बचाव आंदोलनातही त्या सहभागी होत्या. महिलांवरील अत्याचारांना त्यांनी नेहमीच वाचा फोडली. नारी समता मंच, ग्रोइंग टुगेदर, अक्षरस्पर्श ग्रंथालय, सखी, मिळून साऱ्याजणी, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष उवाच अभ्यासवर्ग, पुरुष संवाद केंद्र अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य सुरू होते. रात्रीच्या काळोखात अन्याय-अत्याचाराचे प्रमाण वाढते, हे लक्षात घेऊन रात्रीच हातात टॉर्च घेऊन जनजागृतीसाठी त्यांनी ‘प्रकाशफेरी’ काढली होती. सुशिक्षितांसाठी पथनाट्य, वाढत्या स्त्रीभ्रूणहत्येविरोधात निदर्शने-मोर्चा-परिसंवाद घेतले. एकल स्त्रियांसाठी परिषद, विवाह परिषद, कौटुंबिक समस्या मांडण्यासाठी कुटुंब नियोजन परिषद, स्त्रियांच्या जागृतीसाठी आत्मसन्मान परिषद, ॲसिड हल्ल्यांविरोधात जागृतीसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’ असे अनेक कार्यक्रम त्यांनी ‘नारी समता मंच’च्या वतीने घेतले. इच्छामरणाच्या चळवळीतही त्यांनी पुढाकार घेतला होता. अनेक सामाजिक चळवळींना आर्थिक मदतही त्या करीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Noted activist Vidya Bal dies