esakal | नीरेत मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

नीरेत मुळशी पॅटर्न, कुख्यात गुंड गणेश रासकरची भर चौकात हत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुळुंचे : नीरा (ता. पुरंदर) येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा अज्ञात दोन व्यक्तींनी गोळीबार करून खून केला. नीरेच्या भर चौकाजवळ सातारा- पुणे महामार्गावर सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेने परिसरात थरार निर्माण झाला होता. याबाबत घटनास्थळी असलेल्या नागरिकांकडून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रासकर याला फोन करून बोलावून त्याच्यावर दोन जणांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रासकर याच्यावर चोरी, मारहाण, हत्या यांसह अनेक दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नीरा येथे वास्तव्याला होता.

मात्र, शुक्रवारी सायंकाळी अचानक येथील भारत शांती या कापड दुकानाच्या समोरच त्याला अज्ञातांनी गोळ्या मारल्या. त्यावेळी रासकर त्याच्या मोटारसायकलवर तेथे आला होता. गोळी डोक्याच्या मागील भागास लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला नीरेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला पुण्याला घेऊन जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा: बदला घेण्यासाठी Ex बॉयफ्रेंडची गाडी घेतली अन् 49 वेळा....

दरम्यान, ही घटना कळताच जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक हे घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी उपचारांसाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच, आरोपींचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या जुन्या वादातून रासकर याचा खून झाला असल्याचा व्यक्त केला जात होता.

loading image