शहरात फिरा आता इलेक्‍ट्रिक सायकलवर! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलवरदेखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विकासाला चालना देणारा "फेम 2' प्रकल्प पुढील महिनाभरात देशात राबविण्यात येणार आहे. त्यात ई-सायकलचा समावेश करण्यात येणार आहे.

पुणे : आता तुम्ही शहरातून फक्त इलेक्‍ट्रिक मोटारच नव्हे तर, इलेक्‍ट्रिक सायकलवरदेखील लवकरच सहजपणे फेरफटका मारू शकणार आहात. कारण, इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विकासाला चालना देणारा 'फेम 2' प्रकल्प पुढील महिनाभरात देशात राबविण्यात येणार आहे. त्यात ई-सायकलचा समावेश करण्यात येणार आहे.

 इलेक्‍ट्रिक व हायब्रिड वाहनांच्या विकासाला चालना देण्यासाठी 'फेम 2' हा प्रकल्प केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. त्याचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत आहे. त्याअंतर्गत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी बॅटरी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 'फेम 2' कार्यान्वित करण्यात येणार आहे. याबाबत 'ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया'च्या (एआरएआय) कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते म्हणाले, "केंद्र सरकारने साडेपाच कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला आहे. पुढील महिनाभरात हा प्रकल्प सुरू होईल. त्यापूर्वी ही योजना मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. या योजनेशी संबंधित सर्व मंत्रालयांना यापूर्वीच 'फेम 2' बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.'' 'फेम 2'मध्ये इलेक्‍ट्रिक सायकलचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तो यापूर्वी नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

'एआरएआय'च्या व्यासपीठावरून दोन दिवसांपूर्वीच बोलताना अवजड उद्योग विभागाचे सचिव ए. आर. सिहाग यांनी 'फेम 2'ला 31 मार्चपूर्वी केंद्राकडून मान्यता मिळेल, असे सूतोवाच केले होते. या योजनेतून इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या छोट्या मोटार आणि दुचाकी यांच्यावर भर देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले होते. 
 

'फेम 2'चा फायदा 
- इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरास प्रोत्साहन 
- खनिज तेलाची आयात कमी 
- खनिज तेलाचा खर्चात बचत 
- इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापराने इंधनाची मागणी कमी 
- हवेचे प्रदूषण नियंत्रित 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now ride on electric bicycle in the city!