esakal | चांगली बातमी! आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन
sakal

बोलून बातमी शोधा

learning licenses

चांगली बातमी! आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन

sakal_logo
By
- मंगेश कोळपकर

पुणे : ''लर्निंग लायसन आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी घरी बसूनच ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे. परीक्षेचा निकाल तत्काळ कळणार असून लायसनही संबंधित उमेदवाराला काही क्षणांतच मिळणार आहे. येत्या ८- १० दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठी आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे.''(Now you will get a learning license at home)

केंद्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे सारथी या प्रणालीतही बदल करणअयात आले आहेत. ऑनलाइन लर्निंग लायसनची प्रक्रिया करताना अर्जदाराला रस्ता सुरक्षा विषयक व्हिडिओ पहावा लागेल. त्यानंतर काही प्रश्न येतील. त्यातील किमान ६० टक्के उत्तरे अचूक उत्तर दिल्यास परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या उमेदवाराला घरबसल्या लायसन्सची प्रिंट मिळणार आहे.

त्याचप्रमाणे नमुना एक (अ ) मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा डॉक्टरांमार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्र मार्फत विकसित करण्यात आली असून याद्वारे अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर नमुना एक (अ) अपलोड करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक डॉक्टरने परिवहन संकेतस्थळामार्फत प्रमाणपत्र सादर करायचे आहे. त्यांची कागदपत्रांची पडताळणी करून परिवहन कार्यालयार्फत युजर आयडी दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, किंवा आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नाही, त्यांना पारंपरिक पद्धतीने लर्निंग लायसन काढावे लागेल.

हेही वाचा: पुणे, पिंपरी परिसरातील ड्रायव्हिंग स्कूलही सुरू

''ऑनलाईन लर्निंग लायसनची प्रक्रिया अल्पावधीतच सुरू होईल. त्यासाठीची संगणक प्रणाली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर हा उपक्रम केव्हा सुरू होईल, हे जाहीर करण्यात येईल. या योजनेमुळे नागरिकांना लर्निंग लायसन सुलभपणे मिळेल.''

- अजित शिंदे (प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे आरटीओ)

असा करा ऑनलाईन अर्ज

  • या सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने परिवहन या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंद करणे आवश्यक आहे.

  • त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, स्वाक्षरी आदी तपशील आधार डेटाबेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येईल.

  • त्यामुळे अर्जदाराची किंवा त्याच्या राहत असलेल्या पत्त्याची वेगळी खातरजमा करावी लागणार नाही

  • शाळा सोडण्याचा दाखला व आवश्यक कागदपत्रे त्यावर अपलोड करावी लागणार आहेत.

हेही वाचा: पुण्यातील मंडई भागातील फळ बाजाराला आग लागली;पाहा व्हिडिओ