बारामतीकरांनो, कोरोना रूग्णांचा आकडा पाहा आणि आतातरी काळजी घ्या

बारामतीकरांनो, कोरोना रूग्णांचा आकडा पाहा आणि आतातरी काळजी घ्या

बारामती : तपासण्यांची संख्या वाढू लागली तसा कोरोना रुग्णांचाही आकडा बारामतीत वेगाने वाढू लागला आहे. काल (ता. 10) व परवाच्या (ता. 9) तपासण्या मिळून बारामतीत 527 जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 10 एप्रिल रोजी प्रतिक्षेत असलेल्या 178 नमुन्यांपैकी तब्बल 104 जण पॉझिटीव्ह आढळले. कोरोनाचा बारामतीत समूह संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) झाल्याचे या आकडेवारीवरुन पुढे येत आहे.  यात परवा (ता. 9) 311 आणि काल (ता. 10) 216 जण पॉझिटीव्ह आले आहेत. 

औद्योगिक क्षेत्राला आरटीपीसीआर तपासणी अनिवार्य केल्यानंतर आता बारामतीतील तपासण्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. दररोज तपासण्यांच्या संख्येचा उच्चांक होत असून काल बारामतीत शासकीय स्तरावर तब्बल 922 आरटीपीसीआर तपासण्या झाल्या. शासकीय व खाजगी मिळून कालच्या एकूण तपासण्यांचा आकडा होता 1278. 

दुसरीकडे बारामतीच्या रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने बारा हजारांच्या दिशेने वाटचाल करु लागला आहे. या सर्वात एक दिलासा असा आहे की सापडणा-या रुग्णांपैकी 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नाहीत. एकूण रुग्णसंख्या आज 11735 पर्यंत गेली असून बरे झालेले रुग्ण आज 9335 आहेत. बारामतीतील मृतांचा आकडाही वेगाने वाढत असून आज हा आकडा 182 वर जाऊन पोहोचला. 

बारामतीत तपासण्यांची संख्या अत्यंत वेगाने वाढल्याने आता रुग्णसंख्याही झपाट्याने वाढू लागली आहे, मात्र याचा मोठा ताण आता यंत्रणेवर येऊ लागला आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेवर सध्या कमालीचा ताण असून उपलब्ध मनुष्यबळात ही यंत्रणा अक्षरशः रात्रंदिवस काम करीत आहे. 

चार ते पाच दिवस रिपोर्ट मिळत नाहीत...
औद्योगिक क्षेत्रातील कर्मचा-यांची आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन तपासणी अनिवार्य केल्यानंतर आता खाजगी प्रयोगशाळांवर कमालीचा ताण आला. अचानकच तपासण्यांची संख्या वाढल्याने चार ते पाच दिवस रिपोर्ट मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या. मात्र 10 एप्रिल रोजी शासनाने पूर्वीच्या आदेशात सुधारणा करत  ज्या कर्मचा-यांनी लस घेतलेली नाही त्यांना आरटीपीसीआर ऐवजी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली तरी त्याला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अडचणी वाढतच चालल्या....
एकीकडे ज्यांच वय 45 पेक्षा जास्त आहे, त्यांनाच लसीकरण सुरु आहे, त्या मुळे अनेक कंपन्यातील लहान वयोगटातील कर्मचा-यांची आरटीपीसीआर किंवा अँटीजेन तपासणी गरजेची ठरत आहे. त्यातही एकदा केलेली तपासणी 15 दिवसच ग्राह्य धरली जाणार असल्याने दर पंधरा दिवसांनी कर्मचा-यांची स्वखर्चाने तपासणी करुन घेणे कारखानदारांना परवडणारे नाही. शासकीय प्रयोगशाळेत तपासणी विनामूल्य होत असली तरी तेथेही संख्येवर मर्यादा असल्याने शासकीय यंत्रणेवरील ताणही या आदेशाने अचानकच वाढला. बारामतीत काल एकाच दिवसात तब्बल 1278 तपासण्या झाल्या. संख्या वाढली की त्याचा दर्जावर परिणाम होतो अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करु लागले आहेत. या तपासण्या थांबवल्या गेल्या नाही तर प्रयोगशाळेची यंत्रणाच कोलमडून पडण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. 

चार दिवसानंतरच्या रिपोर्टला काय अर्थ राहणार...
खाजगी प्रयोगशाळेत सध्या चार चार दिवस आरटीपीसीआर तपासणीचा रिपोर्टच मिळत नाही, अशी स्थिती आहे. स्वॅब दिल्यानंतर चार दिवस संबंधित व्यक्ती गावभर फिरत असेल तर त्या स्वॅब देण्याला अर्थ काय उरतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चार दिवसानंतर पॉझिटीव्ह रिपोर्ट आला तरी त्यालाही फारसा अर्थ उरत नसल्याने आता शासनाला सर्वच मुद्यांवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल, अशीच आजची स्थिती आहे. 

रुग्णालय व्यवस्थापनावरही नियंत्रण गरजेचे-
कोणत्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करायचे, कोणाला कोविड सेंटरला ठेवायचे आणि कोणाला गृहविलगीकरणात ठेवायचे याचे व्यवस्थापन आता शासकीय समितीकडे देण्याची वेळ आली आहे. अनेक रुग्णालयातील बेडस लक्षणे नसलेल्या रुग्णांनी अडवून ठेवल्याने ज्यांना खरच वैदयकीय उपचारांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. शासकीय समितीची मान्यता घेतल्याशिवाय या पुढील काळात रुग्णालयात रुग्णास दाखल केले जाऊ नये, अशीही काही जणांची मागणी आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com