पुण्यावर मोदी सरकारची अवकृपा; लशीचे डोस दिलेच नाहीत!

pm modi pune vaccine
pm modi pune vaccine

पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लशीचा अपुरा साठा यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग थंडावला आहे. काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंदही करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरून परत जावं लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून पुणे हॉटस्पॉट आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जिल्ह्याला केंद्राकडून अडीच लाख कोरोना लशीच्या डोसचा पुरवठा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पुण्यात रुग्ण जास्त असल्यानं लशींची गरज जास्त असली तरी मुंबईसह राज्यात अनेक शहरांमध्ये कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. तिथे लस तेवढ्याच प्रमाणात का दिली नाही असे प्रश्न मोहोळ यांना ट्विटमध्ये विचारण्यात आले आहेत. 

राज्यात लशीचा तुटवडा असल्यानं केंद्राकडे जास्तीचे डोस मिळावे यासाठी राज्य सरकारने मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात लशीवरून जोरदार आरोप प्रत्यारोपही झाले. थेट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राने देशाच्या कोरोना लढ्याला सुरुंग लावल्याचं म्हटलं होतं. याशिवाय इतर केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा लशीवरून राज्य सरकारवर टीका केली होती. याला उत्तर देताना राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे असं म्हटलं होतं.

मुंबईसह राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा निर्माण झाला. मुंबईत 99 हजार लशींचे डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती शुक्रवारी मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.  मुंबईत दर दिवशी 50 हजार इतक्या नागरिकांना लस दिली जाते. त्यामुळे 99 हजार लशींचे डोस दोनच दिवस पुरतील त्यानंतर पुन्हा तुटवड्याची परिस्थिती निर्माण होणार आहे. मुंबईशिवाय सातारा, सोलापूर जिल्ह्यालासुद्धा लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात अडीच लाख लशीं मिळाल्या असं म्हटलं असलं तरी शहरात 1 लाख लशीच पोहोचल्या आहेत. तसंच फक्त पुण्यातच नाही तर राज्यातील इतर जिल्ह्यांनाही कमी अधिक प्रमाणात लस देण्यात आली आहे. यामध्ये साताऱ्यात 35 हजार, सोलापुरात 17 हजार लशींचे डोस पुरवठा झाला आहे. याशिवाय पुणे जिल्ह्याला जे डोस देण्यात आले आहेत त्यापैकी 30 हजार लशी पुणे शहर तर 20 हजार डोस पिंपरी चिंचवड शहरासाठी देण्यात आले आहेत. हा लशीचा पुरवठा राज्य सरकारने केला आहे. याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्य सरकारने त्यांच्या कोट्यातून लस दिली असताना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र केंद्र सरकारने लस दिल्याचं सांगत मोदींचे आभार मानले आहेत. 

पुणे शहरात शुक्रवारी नवीन 5 हजार 647 रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 4 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या शहरात 49 हजार 955 रुग्ण उपचार घेत आहेत. 24 तासात 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शुक्रवारी पुण्यात जवळपास 28 हजार कोरोना टेस्ट झाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com