पुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय; सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या ३ हजारापार!

गजेंद्र बडे
Friday, 21 August 2020

शुक्रवारी पुणे जिल्ह्यात ३ हजार ३२४ नवे रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी रुग्णांचा हाच आकडा ३ हजार ५४४ होता. याआधी तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ३० जुलै रोजी पहिल्यांदा दिवसभरातील नव्या रुग्णांचा साडेतीन हजाराचा आकडा क्रॉस झाला होता.

पुणे : पुणे जिल्ह्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवसभरातील एकूण रुग्णांची संख्या शुक्रवारी (ता.२१) म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी तीन हजाराने क्रॉस झाली आहे. यामुळे दोन आठवड्याच्या खंडानंतर पुण्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढू लागल्याचे रुग्णांच्या दैनंदिन अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी पुणे जिल्ह्यात ३ हजार ३२४ नवे रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी रुग्णांचा हाच आकडा ३ हजार ५४४ होता. याआधी तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ३० जुलै रोजी पहिल्यांदा दिवसभरातील नव्या रुग्णांचा साडेतीन हजाराचा आकडा क्रॉस झाला होता. त्यानंतर दोन वेळचा अपवाद वगळता हा आकडा सलग दोन आठवडे तीन हजारांच्या आत  होता. यापैकी एक आठवडाभर तर हा आकडा दोन हजारांच्या आत आला होता. मात्र कालपासून प्रतिदिन नव्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. 

'शिवरायांच्या आशीर्वादामुळेच राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला आणि मी मुख्यमंत्री ही झालो!'​

गेल्या चोवीस तासांत सापडलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ५३६ रुग्णांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ३८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५०५, नगरपालिका क्षेत्रात १९१ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ५४ रुग्ण आढळून आले आहेत. 

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात तब्बल ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३५ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १५, जिल्हा परिषद क्षेत्रातील १०, नगरपालिका क्षेत्रातील तीन आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही गुरुवारी (ता. २०) रात्री ९ वाजल्यापासून शुक्रवारी (ता. २१) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

'हिटमॅन' रोहित शर्मासह पाच खेळाडूंना 'खेलरत्न' जाहीर; पाहा संपूर्ण यादी!​

यामुळे जिल्ह्यातील आजअखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ३९ हजार १८१, कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५ हजार २०९ तर रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३ हजार ४२६ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्णांचा समावेश आहे.

उपचार घेणारे रुग्ण वाढले

दरम्यान, रूग्णालयात आणि घरच्या घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. मागील सलग दहा दिवस या रुग्णांचा एकूण आकडा हा सुमारे २६ हजार होता. मात्र आता हाच आकडा आता ३० हजार ६७३ वर गेला आहे. यापैकी १८ हजार ५१८ रुग्ण रुग्णालयात, तर १२ हजार १५५ रुग्ण आपापल्या घरी राहूनच कोरोनावर उपचार घेत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of corona patients in Pune district began to increase again