
बारामती : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा आज पुन्हा एकदा 74 पर्यंत जाऊन पोहोचला. शहरात सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासन पुढील चिंता वाढू लागली आहे. बारामती शहरात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्या तरी संसर्ग होणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागल्याने आता काही कठोर निर्बंध लादण्याचा दृष्टीने प्रशासनाचा विचार सुरू झाला आहे.
दरम्यान बारामती शहरातील 16 खाजगी रुग्णालय प्रशासनाने अधिग्रहीत केले असून नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याला अनिवार्यपणे रुग्णालयात दाखल केले जात आहे, हा रुग्ण रुग्णालयात असल्यामुळे तो प्रशासनाच्या निगराणीखाली राहत आहे. ही साखळी तोडण्यासाठी या निर्णयाची मदत होणार आहे.
दुसरीकडे गर्दीच्या ठिकाणी गर्दी कमी करण्यासोबतच सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्कचा अनिवार्यपणे वापर करणे, सॅनिटायझर चा वापर करणे, येणाऱ्या लोकांचे नाव पत्ता यांची नोंदणी करणे या बाबी आता अधिक कडक करण्याची मागणी होऊ लागली आहे.
अनलॉक झाल्यानंतर बारामती शहरातील गर्दी कमालीची वाढली आहे, अनेक ठिकाणी लोक बिनधास्तपणे मास्क न वापरता वावरतांना दिसतात. पोलीस प्रशासनावर मनुष्यबळाच्या मर्यादा असल्यामुळे सर्वांवर कारवाई करणे शक्य होत नाही, मात्र नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असल्याचे मत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आरटीपीसीआर तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णां बाबतची माहिती आरोग्य विभागाला देण्याची विनंती करण्यात आली आहे.
लग्न समारंभावर मर्यादा हव्यात ....
अनेक रुग्ण बारामती शहरासह इतर ठिकाणी लग्नाला उपस्थित राहून आल्यानंतर पॉझिटिव्ह येत आहेत, त्यामुळे आता लग्न समारंभावर मर्यादा आणण्याची मागणी लोकांमधून होत आहे.
गंभीर रुग्णांची संख्या नगण्य....
कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी गंभीर रुग्णांची संख्या नगण्य आहे हा बारामतीकरांसाठी दिलासा आहे. आजमितीस बारामतीत 512 एक्टिव्ह रुग्ण असून यापैकी केवळ पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही ही देखील एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. दुसरीकडे सिल्वर जुबली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय या दोन्ही रुग्णालयात 114 बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, या व्यतिरिक्त खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध असून नटराज कोविड केअर सेंटर मध्ये देखील रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
• आजची कोरोना रुग्णांची परिस्थिती
• कालचे शासकीय (ता. 10) एकूण rt-pcr नमुने 257.
• काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 74.
• शहर-42. ग्रामीण- 32.
• एकूण रूग्णसंख्या-7345
• एकूण बरे झालेले रुग्ण- 6683
• एकूण मृत्यू-- 147.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.