''जुन्नर तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात''

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

'मे ते सप्टेंबर दरम्यान नारायणगाव, वारूळवाडी उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या तेरा गावात कोरोना रूग्णांची संख्या वाढली होती.जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार या भागांत घरोघरी जाऊन तीन टप्प्यात नागरिकांची तपासणी करण्यात आली.

नारायणगाव: ''जुन्नर तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.''असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात हॉटस्पॉट ठरलेल्या नारायणगाव, वारुळवाडी, येडगाव परिसरातील तेरा गावात उल्लेखनीय वैद्यकीय सेवा पुरवून कोरोना नियंत्रण व प्रबोधन या बाबत उल्लेखनीय काम केल्या बद्दल येडगाव ग्रामपंचात, सोसायटी, येडेश्वर पतसंस्था व कुलस्वामी महिला दूध उत्पादक संस्था यांच्यावतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजाळ, मंडलाधिकारी दादाभाऊ काळे, पोलीस पाटील गणेश बांगर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षकांचा सत्कार ग्रामनेते गुलाबराव नेहरकर, मच्छिंद्र काशीद, सरपंच नरेश नेहरकर, दिनेश जोरे, राजेंद्र गावडे, देविदास भोर यांच्या हस्ते  करण्यात आला. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व शिक्षकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात डॉ. गुंजाळ यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या पुढील काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ.गुंजाळ म्हणाल्या, ''मे ते सप्टेंबर दरम्यान नारायणगाव, वारूळवाडी उपकेंद्रा अंतर्गत असलेल्या तेरा गावात कोरोना रूग्णांची संख्या वाढली होती. जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार या भागांत घरोघरी जाऊन तीन टप्प्यात नागरिकांची तपासणी करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह व संशयित रूग्णांवर उपचार केले. यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली होती. मागील तीन दिवसांत तालुक्यात ९९ कोरोना रूग्ण आढळून आले असून १०० संशयित रूग्णांचे स्लॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तालुक्यात मागील आठ महिन्यात  ४९३९ रुग्णांना कोरोना संसर्ग झाला होता, त्यापैकी ४४८४ रुग्ण बरे झाले असून २१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.''

पुण्यात सायकलट्रॅकचा वापर नगण्यच; 82 टक्के सायकलस्वारांची पाठ  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of corona patients starts increasing again in Junnar taluka