बसथांबा बनला खाजगी रिक्षाथांबा ; कात्रज बसथांब्यावरील परिस्थिती, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 January 2021

कात्रज चौक हा रहदारीचा भाग असून या बसथांब्यावरून शहरातील मध्यवर्ती भागात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते.

कात्रज : कात्रज बसथांबा हा खाजगी रिक्षाथांबा बनला आहे. मुख्य कात्रज चौकातील कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयासमोरील पीएमपीएल बसथांब्यावर रिक्षाचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रिक्षाचालक थेट पीएमपीएलच्या बसथांब्यावर येऊन प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे बसेसना अडथळा होत असून बस थांबविण्याची जागा रिक्षांनी घेतली आहे. त्यामुळे बसचालकांनाही मोठ्या प्रमाणावर बस चालवताना कसरत करावी लागत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कात्रज चौक हा रहदारीचा भाग असून या बसथांब्यावरून शहरातील मध्यवर्ती भागात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते. रिक्षा थांबत असलेल्या ठिकाणांपासून साधरणतः १०० मीटर अंतरावर मुख्य कात्रज चौकात वाहतूक पोलिसांचा गराडा असतो. परंतु वाहतूक पोलिस कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या हेतूविषयी शंका उपस्थित होत आहे. प्रवाशांकडून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा : ऐतिहासिक आणि साहित्यिक पार्श्वभूमी असलेल्या गोखले चौकाचे सुशोभीकरण ; तिथे साकारला जातोय कलाकार कट्टा

पीएमपीएलकडून एलटीडी बससेवेलाही सुरवात झाली आहे. त्यामुळे कात्रजवरून सुपरफास्ट बसेसही प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, नागरिकांना कात्रजवरून शहरातील विविध भागात अटल बस योजनेअंतर्गत पाच रुपयांत प्रवास करता येत असल्याने रिक्षावाल्यांचा दर परवडतही नाही. परंतु विनाकारण प्रवाशांना रिक्षाचालकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रवाशी सांगतात.

हे ही वाचा : किरकटवाडीत चंदन तस्करांचा धुमाकूळ ; शेतकऱ्याच्या घराजवळून चोरली दोन चंदणाची झाडे

रिक्षावाल्यांचा खरा त्रास हा प्रवाशांना आणि पीएमपीएलच्या वाहनचालकांना आहे. त्यामुळे वाहनचालकांना सातत्याने त्रास होत आहे. रिक्षावाल्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला. पंरतु काही साध्य होत नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या मदतीसाठी दोन माणसे नेमलेली आहेत, यामध्ये वाहतूक पोलिसांनी हस्तक्षेप करून कारवाईची अपेक्षा आहे. परंतु उलट वाहतूक पोलिस शाखेकडून आम्हालाच रिक्षावाल्यांना जागा कुठे दिली आहे? अशा स्वरूपाचे प्रश्न केले जातात. 
- विजय रांजणे, कात्रज आगार व्यवस्थापक

आमच्याकडून सातत्याने कारवाई सुरु असून रिक्षावाल्यांना शिस्तीत रिक्षा चालवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. यापुढे असे काही निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. 
- उदयसिंह शिंगाडे, पोलिस निरिक्षक वाहतूक, भारती विद्यापीठ

कात्रज चौकातील पीएमपीएल बसथांब्यावर रिक्षावाल्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचबरोबर बसथांब्याच्या समोरच रिक्षा थांबवल्याने बस पकडण्यासाठी गोंधळ उडतो. त्याचबरोब बससाठी थांबल्यावर रिक्षावाले सातत्याने प्रवासासाठी विचारतात. त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. 
- रेश्मा मोरे, महिला प्रवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of rickshaw pullers at the PMPL bus stand in front of the kondhwa yeolawadi regional office at katraj chowk has increased significantly