
MPSC : एमपीएससीच्या ‘टंकलेखन चाचणी’ पद्धतीवर आक्षेप
पुणे : लिपिक व करसहायक संवर्गासाठी काही उमेदवारांकडून बोगस टंकलेखक प्रमाणपत्र सादर करण्यात येत होते. याला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) टंकलेखन कौशल्य चाचणी घ्यायचे ठरविले.
मात्र, त्यासाठी दिलेले नवीन डेमो सॉफ्टवेअर अडचणीचे असून, १० मिनीटांत ३०० मराठी शंब्द टंकलिखीत करण्याची अट म्हणजे ‘टाईपरायटर’चीच परीक्षा असल्याचा खोचक आरोप उमेदवारांनी केला आहे.
मंत्रालयीन लिपिक टंकलेखक व कर सहायकांना पूर्व आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘टायपिंग’ची परीक्षा उत्तीर्णची अट आहे. एक हजार ४६४ जागांसाठी राज्यातील जवळपास दीड लाख तरूण-तरूणींनी परीक्षा दिली. पूर्व आणि मुख्य परीक्षेनंतर ७ एप्रिलला टंकलेखन कौशल्य चाचणी येवून ठेपली असता, आठ दिवस आधी एमपीएससीने २९ मार्चला नवीन सॉफ्टवेअर (डेमो) उमेदवारांना पाठविले.
त्यात परीक्षा मराठीतून आणि डेमो हिंदीतून अशी स्थिती झाली आहे. तसेच दहा मिनिटांत उतारा वाचून तब्बल ३०० शब्द टंकलिखीत करायची आहेत. हे दोन्ही निर्णय अन्यायकारक असल्याचे अनेक उमेदवारांचे म्हणने असून, आयोगाने न्याय निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
उमेदवार म्हणतात...
- दहा मिनीटात उतारा वाचून ३०० मराठी शब्द आणि ४०० इंग्रजी शब्द टाईप करणे अशक्य
- नवीन की-बोर्ड सहा दिवसांत आत्मसात करणे अवघड
- मराठी टंकलेखनासाठी हिंदी भाषेचे सॉफ्टवेअर का?
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या जीसीसी-टीबीसी नियमाप्रमाणे चाचणी घ्यावी
- दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर टंकलेखन परीक्षा फक्त पात्रतेसाठी अपेक्षीत
टंकलेखनासाठी निर्धारीत वेगापेक्षा सराव चाचणीतील वेग दुपटीने जास्त दिला होता. कौशल्य चाचणी घेणाऱ्या संस्थेने हिंदीतील फॉंट दिल्याने एक आठवड्यात तो आत्मसात करणे आवघड आहे. मराठी टंकलेखनासाठी आजवर सर्व लोक सी-डॅकने तयार केलेल्या सॉफ्टवेअरचाच वापर करतात. तोच आयोगानेही स्विकारावा.
- ओंकार जाधव(नाव बदललेले), पात्र उमेदवार
पूर्व आणि मुख्य परीक्षा आम्ही उत्तीर्ण झालो आहे. त्यामुळ फक्त पात्रतेसाठीच टंकलेखन चाचणी घेणे आवश्यक आहे. मात्र, आयोगाने आता जे नवीन सॉफ्टवेअर व नियम सांगितले आहेत. त्यामुळे तर सर्वच विद्यार्थी बाहेर पडले जातील.
- शितल जोशी (नाव बदललेले), पात्र उमेदवार
टाईमलाईन
- १६ नोव्हेंबर २०२१ ः टंकलेखन चाचणीचे स्वरूप व निकष ठरले.
- ३ एप्रिल २०२२ ः पूर्व परीक्षा
- १३ ऑगस्ट २०२२ ः मुख्य परीक्षा
- डिसेंबर २०२२ ः ‘मुख्य’चा निकाल
- २४ जानेवारी २०२३ ः टंकलेखन चाचणीसाठी सर्वसाधारण सूचना
- २९ मार्च २०२३ ः जानेवारीतील सूचना मागे घेत, नवीन नियम
- ७ एप्रिल २०२३ ः टंकलेखन कौशल्य चाचणी
पदांचे विवरण
- मराठी लिपिक ः १०७७
-इंग्रजी लिपिक ः १०२
- कर सहायक ः २८५