मांजरी रस्ता रुंदीकरणात  अतिक्रमणांचे अडथळे 

gawade2.jpg
gawade2.jpg

पुणे ः प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार, तसेच पूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे 1986 मध्ये मंजूर झालेला मुंढवा-मांजरी हा रस्ता सरकारच्या लालफितीत अडकला आहे. रस्त्याच्या जागेत केलेल्या अतिक्रमणांमुळे रस्ता रुंदीकरणात अडथळे येत आहेत. नियमितची वाहतूक कोडी व वाढत्या अपघातांच्या प्रमाणांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 


1986 मध्ये मंजूर झालेल्या मुंढवा-मांजरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. केशवनगर ते मांजरी रस्त्यावर शिवाजी चौक, शिंदेवस्ती व लोणकर वस्ती दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण करून हातगाड्या व व्यावसायिकांनी रस्त्याची जागा अडविली आहे. त्यामुळे रस्ता फारच अरुंद झाला आहे. त्यामुळे रोजच वाहतूक कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागते. अतिक्रमणांमुळे शिवाजी चौकातून मांजरी रस्त्यावरून एका वेळी दोन वाहनेही जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. 

केशवनगर गावात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. तेथे बांधकाम साहित्यांची ने-आण करण्यासाठी मांजरी, अमनोरा पार्क, साडेसतरानळीकडे जाणाऱ्या जड वाहनांसह अन्य वाहनांची या रस्त्यावर सतत वर्दळ असते. त्यामुळे गावात वारंवार वाहतुकीची कोंडी होते असते. त्यामुळे पादचारी व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. 

केशवनगर ते वसंतदादा साखर संशोधन केंद्रापर्यंतच्या रस्त्याची रुंदी 160 फूट इतकी ठरविण्यात आली होती. त्या वेळी शासनाने काही शेतकऱ्यांना व जागा मालकांना त्याचा मोबदला दिला होता, परंतु मोबदला घेऊनही काहींनी पुन्हा रस्त्याच्या जागा दुसऱ्यांना विकल्या. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत, तर काही ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटची घरे, घरांच्या पुढे पत्र्याचे शेड, टपऱ्या टाकण्याचे प्रकार आजही सुरू आहेत. त्यामुळे रस्ता अजूनच अरुंद झाला असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 
--------------- 
नागरिकांच्या प्रतिक्रियाः- 
------------------- 
दत्तात्रय कोद्रे ः महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी लवकर पावले उचलावी. या रस्त्यासाठी शासनाने आमच्या जमिनी घेतल्या आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता रुंद झाला नाही. रुंदीकरण होणार नसल्यास शासनाने आमच्या घेतलेल्या जमिनी आम्हाला परत द्याव्यात. 
----------------- 
सतीश शिरवाळे ः मी याच भागात राहतो. विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. गेल्या काही महिन्यांपूर्वी शाळेत जाणारी सुजाता ढाकणे या मुलीला टेम्पोने धडक दिल्याने तिला आपला जीव गमवावा लागला होता. 
---------------------- 
ओमकांत बोने ः केशवनगर मांजरी या वर्दळीच्या रस्त्यावर दुतर्फा उभी राहणारी वाहने, हातगाड्यांमुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. वाहतूक विभागाने वाहतुकीस अडथळा करणाऱ्या व्यावसायिकांवर व कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी. 
--------------------- 
विक्रम लोणकर ः केशवनगर येथील गजानन महाराज मंदिराजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावर, शिक्षक सोसायटी, ससाणे कॉलनी, लक्ष्मीनारायण पार्क या भागात अवजड व चारचाकी वाहने कायमस्वरूपी उभी केली जातात. त्यामुळे अरुंद रस्ता अधिकच अरुंद होऊन, या रस्त्यावर वारंवार कोंडी होते. गेल्या काही वर्षांत अपघातात नऊ जणांचा बळी गेला आहे. अजून किती बळी जाण्याची शासन वाट पाहणार आहे. 
---------------------- 

""केशवनगर-मांजरी रस्ता अजूनही बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. गेल्या दोन वर्षांपासून केशवनगर गावाचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे. सदर रस्ता महापालिकेकडे वर्ग करणे आवश्‍यक आहे, परंतु महापालिकेकडून अद्यापही पावले उचलली जात नाही. त्यामुळे यापुढे महापालिकाच या रस्त्याविषयी निर्णय घेईल.'' - नानासाहेब परभणे, अभियंता, सरकारी बांधकाम विभाग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com