

ओडिशात पुन्हा पावसाचा इशारा
पूरग्रस्त गावांमध्ये अद्याप पाणी कायम
भुवनेश्वर, ता. ५ (पीटीआय) : ओडिशामध्ये पूरस्थिती पूर्णपणे ओसरलेली नसतानाच भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) बुधवारपासून १० ऑगस्टपर्यंत राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जाजपूर, भद्रक आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये अजूनही पाणी साचले असून, रस्ते जलमय असल्याने नागरिकांना घरी परतता आलेले नाही.
आयएमडीने बुधवारी मयूरभंज जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ''ऑरेंज अलर्ट'' जारी केला असून, सहा ऑगस्ट रोजी मयूरभंज आणि किओंझार जिल्ह्यांसाठीही हाच इशारा देण्यात आला आहे. याशिवाय सुंदरगड, संबलपूर, नुआपाडा, कालाहांडी, कंधमाल, कोरापुट, मल्कानगिरी, गजपती, गंजाम, नयागड आदी जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य सचिव अनु गर्ग यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुनर्वसन आणि दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. अलीकडील पुरामुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील ८.६३ लाखांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. ८५ ब्लॉकमधील १,४५८ गावांना पुराचा वेढा पडला होता आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३,५६७ घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बीजेडीचे वरिष्ठ नेते संजय दास बर्मा यांनी सरकारवर पूरग्रस्तांना पुरेसे अन्न, ताडपत्री आणि इतर मदत न पुरवल्याचा आरोप केला आहे.
आसाममधील पूरामुळे मोठे नुकसान
शिवसागर (आसाम) : केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी बुधवारी पूरग्रस्त आसामचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. पूरामुळे झालेल्या विध्वंसाचे प्रमाण मोठे असून राज्यातील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी वेळ लागेल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासमवेत नड्डा यांनी शिवसागर जिल्ह्यातील नागालँड सीमेवरील नेपाळीखुटी परिसराची पाहणी केली. १९ जुलैपासून आलेल्या पुराच्या तडाख्यात या भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. पूरग्रस्त कुटुंबांशी संवाद साधल्यानंतर नड्डा म्हणाले, की या भागातील विध्वंस प्रत्यक्ष पाहिला. नुकसान इतके व्यापक आहे, की जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही काळ लागणार आहे. केंद्र सरकार आर्थिक मदत, पुनर्वसन, नुकसानभरपाई आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.दरम्यान, आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर असून मृतांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. पाच जिल्ह्यांतील १.२२ लाखांहून अधिक नागरिक अजूनही पुरामुळे प्रभावित आहेत. दरम्यान, रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.