पालिकेतील अधिकारी अतिरिक्त आयुक्तपदी  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

महापालिकेतील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी महापालिकेतीलच एका वरिष्ठ सहआयुक्तांची नेमणूक होणार असून, त्याबाबतचा निर्णय पुढील आठवडाभरात होईल, असे राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे - महापालिकेतील तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी महापालिकेतीलच एका वरिष्ठ सहआयुक्तांची नेमणूक होणार असून, त्याबाबतचा निर्णय पुढील आठवडाभरात होईल, असे राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. या पदावर सहआयुक्त विलास कानडे, सुरेश जगताप, ज्ञानेश्‍वर मोळक आणि अमरीश गालिंदे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, असेही सांगण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील महापालिकांच्या वर्गवारीनुसार अतिरिक्त आयुक्‍तांची पदे निश्‍चित करण्यात आली असून, त्याप्रमाणात महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तपदे मंजूर आहेत. यातील दोन पदे राज्य सरकारकडून तर, एका अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक महापालिकेतील अधिकाऱ्यांमधून करायची आहे. त्यानुसार तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी २०१६ मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला.  मात्र त्यावर निर्णय न घेताच राज्य सरकारने दीड वर्षांपूर्वी तिसरे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ. बिपिन शर्मा यांची नियुक्त केली होती. त्यावरून अधिकारी-कर्मचारी संघटनेने नाराजी व्यक्त केली होती. 

दरम्यान, डॉ. बिपिन शर्मा प्रशिक्षणासाठी परदेशात आहेत. त्यामुळे गेले वर्षभर हे पद रिक्त आहे. सध्या अतिरिक्त आयुक्तपदांवर रूबल अगरवाल आणि शंतनू गोयल कार्यरत आहेत. तेव्हाच जुना प्रस्ताव मार्गी लावून महापालिकेतील अधिकाऱ्याची अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्याचा आग्रह महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे धरला होती. महापालिकेची वाढलेली हद्द, दैनंदिन कामे आणि प्रशासकीय यंत्रणा लक्षात घेता महापालिकेत पूर्ण वेळ तिसरे अतिरिक्त आयुक्त नेमण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पुढील काही दिवसांत नव्या अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officer in the Municipality as Additional Commissioner

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: