esakal | राजकारणी मंडळीमुळे पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील अधिकारी, डॉक्टर हैराण

बोलून बातमी शोधा

Jumbo Hospital Pune
राजकारणी मंडळीमुळे पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधील अधिकारी, डॉक्टर हैराण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - एकीकडे २४ तास उपचार व्यवस्था सुरू असलेल्या जम्बो हॉस्पिटलला आता राजकारणांकडून ‘डोस’ दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. उपचार व्यवस्थेची विचारपूस करण्याऐवजी उपचारांवरील खर्च, त्याच्या कारणांचाच हिशेब राजकारणी मंडळी मागत असल्याने जम्बोतील अधिकारी, डॉक्टर हैराण झाले आहेत.

महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जम्बोला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यावरून नाराज झालेल्या डॉक्टरांनी काम थांबविण्याची भूमिका घेतली. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी डॉक्टरांची बैठक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

शिवाजीनगर येथील जम्बोत हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जेवणापासून, स्वच्छता, सुरक्षासुरक्षाकांची सोय असल्याने ही कामे मिळविण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते विशेषत: नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत. मात्र, गेल्या वर्षभरापासून काम करीत असलेल्या एजन्सींकडे कंत्राट असल्याने अन्य ठेकेदार नेमण्यास जम्बोच्या व्यवस्थापनाचा नकार आहे. तरीही, राजकीय दबाव आणून कामे घेण्याची धडपड नगरसेवक करीत असल्याचे दिसत आहे. मात्र, कामे मिळत नसल्याने उपचार व्यवस्थेवर आक्षेप घेत, नगरसेवक जम्बोच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करीत असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. त्यातून काही नगरसेवक थेट जम्बोत येऊन पाहणीच्या नावाखाली हिशेब मागत असल्याचेही ‘जम्बो’तील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: मुळशी येथे पोलिसांची नाकाबंदी

जम्बो हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या स्थितीत व्यवस्थेवर आक्षेप घेऊन अडथळा निर्माण करणे योग्य नाही. जम्बो व्यवस्थापनाशी चर्चा केली असून, त्यांना सहकार्य करू.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

लोकप्रतिनिधींनी कोरोना संकट काळात पुणेकरांना विश्‍वास देण्याची गरज आहे. तो न देता उपचार व्यवस्थेत अडथळे आणण्याची भूमिका चुकीची आहे. हॉस्पिटलसारख्या ठिकाणचे कंत्राट मिळविण्यासाठी दबाव आणणाऱ्या लोकप्रनिधींवर साथरोग नियंत्रण कायद्यातर्गंत कठोर कारवाई झाली पाहिजे.

- विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच