पुण्यात खड्डे बुजवायला वापरताहेत ‘शिळामाल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Work

अशास्त्रीय पद्धतीने शहरातील रस्ते केल्याने आता खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.

पुण्यात खड्डे बुजवायला वापरताहेत ‘शिळामाल’

पुणे - अशास्त्रीय पद्धतीने शहरातील रस्ते केल्याने आता खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. तरीही महापालिकेचा कारभार सुधारण्याचे नाव घेण्यास तयार नाही. आता तर खड्डे बुजविण्यासाठी थेट महापालिकेच्या येवरडा येथील हॉक्समिक्स प्लांटवरील टाकावू स्वरूपाचा व वापर करू न शकणारा शिळा माल वापरला जात आहे. त्यामुळे खड्डे सुद्धा निकृष्ट पद्धतीने बुजविले जात असल्याचे समोर आले आहे.

शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण झाल्याने आता खड्डे बुजविण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे निर्माण झाले आहे. आयुक्तांनी खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक क्षेत्री कार्यालयावर एक पथक नेमण्याचे आदेशही दिले आहेत. पण हे खड्डे योग्य पद्धतीने बुजविले जात नसल्याचे समोर आले आहे.

खड्डे बुजविताना खड्ड्यातील पाणी काढून, त्यात व्यवस्थित डांबर व इतर केमिकल टाकणे आवश्‍यक आहे. पण आता पथ विभागाचे कर्मचारी डंबरमधील शिळा माल थेट रस्त्यावर ओतत आहेत, मजुरांकडून तो माल पसरविल्यानंतर त्यावर रोडरोलर फिरवत आहेत. खड्ड्यातील पाणी सुद्धा काढून टाकेल जात नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात या खड्ड्यातील खडी निघून पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. तसेच खडी पसरल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. सिंहगड रस्त्यावर शिळा माल टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते.

शिळा माल म्हणजे काय?

महापालिकेचा येरवडा येथे हॉटमिक्स प्लांट आहे. तेथे डांबरावर प्रक्रिया करून डांबरीकरणासाठी माल तयार केला जातो. हॉटमिक्स आणि कोल्डमिक्स हे केमिकलयुक्त डांबर ट्रकमध्ये भरत असताना काही माल ट्रकमधून खाली पडतो, तो पुन्हा वापरात येत नाही. तसेच या प्लांटमध्ये व्यवस्थित मिश्रण न झालेले डांबर व खडी फेकून दिली जाते. यास शिळामाल असा शब्द पथ विभागात वापरला जातो. हाच शिळामाल आता खड्डे बुजविण्यासाठी वापरत आहेत. डांबर मिश्रित खर्डीचे मोठेच्या मोठे ढेकळे रस्त्यावर टाकले जात आहेत.

‘सिंहगड रस्त्यावर शिळा माल टाकून खड्डे बुजविले जात आहेत. व्यवस्थित दबाई केल्याने येथे किमान पावसाळा होई पर्यंत तरी खड्डा पडणार नाही.’

- अमर शिंदे, कार्यकारी अभियंता

Web Title: Old Material Used To Fill Road Pits In Pune Cheating

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..