मरणासन्न जिणं कंठणाऱ्या आजींना मिळाला ‘किनारा’ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

दिवसभर विविध तपासण्या
जिजाबाई शिंदे यांच्यावर औंध सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना उच्च रक्तदाब आहे. तसेच पोटही फुगलेले आहे. हातापायावर मोठी सूज आहे. त्यासाठी दिवसभर विविध तपासण्या करण्यात आल्या. चार सलाईन लावण्यात आले. त्या बऱ्या झाल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून किनारा वृद्धाश्रमात नेले जाईल, अशी माहिती डॉक्‍टरांनी दिली.

पिंपरी - दोन घासांसाठी आणि औषधोपचारासाठी भयाण अंधाऱ्या खोलीत कोंडून पडलेल्या वृद्धेला अखेर ‘किनारा’ मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची जीवननौका भयसागरात भरकटत होती. ‘सकाळ’ने त्यांची व्यथा मांडली आणि मंगळवारी पहाटेपासूनच मदतीचे शेकडो हात सरसावले. त्यांना सकाळी औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसानंतर डॉक्‍टरांच्या सल्ल्यानंतर कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमात देखभालीसाठी ठेवले जाणार आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पिंपरी-चिंचवड शहरातील काळा खडक परिसरातील गौसिया मस्जिद लगतच्या वस्तीमधील जिजाबाई शिंदे यांच्यावरील ओढवलेली परिस्थिती ‘मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं’ या मथळ्याखाली ‘सकाळ’मधून मंगळवारी जगासमोर आली. हे वृत्त वाचून पहाटेपासून अनेकांनी मदतीचे पुढे हात केले. तसेच सोशल मिडियामुळे बातमीने देशाच्या सीमा ओलांडल्याने मदतीसाठी संघटना, व्यक्ती यांचे गट तयार झाले. कोणी कपडे, औषधे, जेवण कायमस्वरूपी पुरविण्याची तयारी दर्शविली. कोणी रुग्णालयाच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी पुढे आले. तसेच कशा पद्धतीची मदत देऊ इच्छितो, मदत घेऊन आम्ही कोठे पोचू, अशा विचारणा करण्यासाठीही अनेकांनी ‘सकाळ’शी संपर्क साधला. 

मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ)

‘रॉबीनहूड’ या स्वयंसेवी संस्थेचे वाकड परिसरातील स्वयंसेवक अनघा घाटोळे, रश्‍मी मोकाशी, कुणाल हे सकाळी आठ वाजताच आजींच्या घरी पोचले. खोलीचा दरवाजा उघडताच उग्र दर्प आणि डासांचे थवे बाहेर आले. अंगाचे मुटकुळे करून आजी पडल्या होत्या. सर्वांनी मिळून त्यांना बसवले. सोबत आणलेले ब्लॅंकेट, स्वेटर त्यांच्या अंगावर घातले. त्यानंतर ‘किनारा’च्या संचालिका प्रीती वैद्य पोचल्या. सर्वांनी मिळून वाकड पोलिस चौकी गाठली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. नंतर रुग्णवाहिका आणली. वाकड भागाचे नगरसेवक राहुल कलाटे आले. आजीच्या घरासमोर अनोळखी आल्याने परिसरात गर्दी झाली. 

महिलांना अश्रू अनावर
बातमी वाचून अनेक लोक मदत घेऊन आले होते. एकाने साडी आणली होती. लहान मुलांनी फळे आणली होती. वस्तीतील लोकांच्या सहकार्याने आजींना खोलीतून बाहेर आणून रुग्णवाहिकेत बसविले. त्यावेळी आजूबाजूच्या महिलांना अश्रू अनावर झाले. सुरुवातीला आजी दवाखान्यात यायला तयार नव्हत्या. मात्र, त्यांना कन्नड भाषेत धीर दिल्यावर ‘बऱ्या झाल्यावर पुन्हा येथे आणू, आम्ही आता तुमच्यासोबत येतो, अशी समजूत काढल्यावर त्या तयार झाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old women support life help humanity