मिट्ट काळोख्या खोलीत आजीबाईंचं मरणासन्न जिणं (व्हिडिओ)

अविनाश म्हाकवेकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

‘स्मार्ट सिटी’च्या नावाने दिवसागणिक अफाट वेगाने वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात एक जराजर्जर वृद्धा अन्नपाण्याविना तडफडत आहे. नवऱ्याचे निधन झाले. दोन तरणीबांड मुले डोळ्यांदेखत गेली. आता ती अनाथ आहे. कन्नडशिवाय भाषा येत नाही. ती इवल्याशा खोलीतील मिट्ट काळोखात भयाण अवस्थेत बसून आहे.

पिंपरी - ‘स्मार्ट सिटी’च्या नावाने दिवसागणिक अफाट वेगाने वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात एक जराजर्जर वृद्धा अन्नपाण्याविना तडफडत आहे. नवऱ्याचे निधन झाले. दोन तरणीबांड मुले डोळ्यांदेखत गेली. आता ती अनाथ आहे. कन्नडशिवाय भाषा येत नाही. ती इवल्याशा खोलीतील मिट्ट काळोखात भयाण अवस्थेत बसून आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कुडीतला जीव जात नाही, म्हणून ती झोपडीत पडून आहे. वाकडच्या काळाखडक परिसरातील या वृद्धेला गरज आहे ती दोन घासांची आणि चांगल्या औषधोपचारांची.
काळा खडक परिसरातील गौसिया मस्जिदलगतची वस्ती म्हणजे हातावरचे पोट असणाऱ्यांची. दररोज मिळेल त्या कामावर जाणारी. महाराष्ट्र, कर्नाटकाच्या दुष्काळी पट्ट्यातील लोक ३५-४० वर्षांपूर्वी इथे आले. पत्र्याची घरे बांधून एकमेकाला साथ देत परिस्थितीशी झगडत स्थायिक झाले. यातीलच एक म्हणजे जिजाबाई मारुती शिंदे. वयाची नव्वदी ओलांडलेली. विजापूर जिल्ह्यातील उडचणहट्टी (ता. इंडी) सोडून अनेक वर्षांपूर्वी नवऱ्यासोबत त्या येथे आल्या. त्याच्यासोबतीने बिगारी काम करू लागल्या.

Video : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेलो....  

मात्र, काही वर्षांनी दोन मुले पदरात टाकून पती साथ सोडून देवाघरी निघून गेला. मुले तरुण झाली; मात्र, काही वर्षांच्या फरकाने त्यांचाही मृत्यू झाला. त्यालाही आता पाच-सहा वर्षे उलटून गेली. तेव्हापासून जिजाबाई हादरून गेल्या. काही काम करावे म्हटले तर उतरत्या वयात झेपेनासे झाले. आता तर त्यांना चालताही येत नाही. जमिनीवर घसटत घसटत पुढे जातात. आजूबाजूच्या लोकांनी तिला काही वर्षांपूर्वी त्यांना सात बाय आठची खोली बांधून दिली होती. आता या खोलीला अवकळा आली आहे.

Video : पुण्यातील फुगेवाडी दुर्घटनेचा असा घडला थरार!

दिवसाही मिट्ट काळोखाने ती भरून गेलेली आहे. भिंतींना कोळीष्टकांचा वेढा आहे. धुळीनी माखलेली प्लॅस्टिकची भांडी जमिनीवर इतस्तत: पडलेली आहेत. हेच जिजाबाईंचे म्हणायला असलेले घर. केस पिंजारलेले, लज्जारक्षणापुरतेच उरलेले कळकटलेले वस्त्र, प्रचंड सुजलेले डोळे, हात-पाय...असा सारा जेमतेम काही किलो वजन भरेल, असा देह दोन वेळच्या अन्नासाठी भुकेला आहे. थंडी वाजते म्हणून कधीतरी खोलीबाहेर सरपटत येऊन त्या दुपारच्या कडक उन्हात बसतात. दररोजचे आहे म्हणून जाणाऱ्या येणाऱ्यांचे दुर्लक्ष होते. दवाखान्यात चला म्हटल्यावर पैसे नाहीत, असे त्या सांगतात. तिथे खूप पैसे लागतात, एवढंच त्या बोलतात. त्यांची दृष्टी चांगली आहे. आवाज खणखणीत आहे. ऐकायला थोडे कमी येते. मात्र, वृद्धावस्था आणि परिस्थितीपुढे त्या हतबल झाल्या आहेत. त्यांना सगळे सोडून गेले. फक्त भीतिदायक खोलीतील अंधाराने सोबत सोडलेली नाही. या जिजाबाईंना आता आधाराची गरज आहे. समाजात जिवंत असलेली माणुसकी जर दोन पावले पुढे आली तर त्या शेवटचे काही दिवस आनंदात जगू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: darkness room old women life