थकित ऊस बील रकमेसह इतर देयकासाठी ओंकार कारखान्यासमोर सत्याग्रह आंदोलन !

थकित ऊस बील रकमेसह इतर देयकासाठी  ओंकार कारखान्यासमोर सत्याग्रह आंदोलन !
Published on

ओंकार साखर कारखान्यासमोर
थकीत ऊस बिलासाठी आंदोलन
-----
ऊस उत्पादक संघर्ष समितीचा पुढाकार
-----
सिरसाळा, जि. बीड : साखर कारखान्याने जाहीर केलेल्या दराप्रमाणे थकीत ऊस बिल रक्कम, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांची देयके तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे, या मागणीसाठी ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार (वैद्यनाथ) साखर कारखान्यासमोर शुक्रवारपासून (ता. ८) सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागील चार महिन्यांपासून कारखान्यास गेलेल्या उसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना वारंवार आश्वासनांची बोळवण करून वेळ मारून नेत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. प्रत्येक वेळी नवीन तारीख दिली जात असून, शेतकऱ्यांना जाहीर केल्याप्रमाणे प्रति टन २९५० रुपये तत्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
हार्वेस्टर मालक, ऊसतोडणी मजूर आणि कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न केल्यास कारखान्याला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उसाची बिले वेळेवर न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
या आंदोलनात श्रीराम बडे, सूर्यकांत तिडके, ॲड. अजय बुरांडे, ॲड. श्रीनिवास मुंडे, अविनाश मुंडे, परमेश्वर मुंडे, शंकर शेजुळ, मारुती गीते, गंगाधर पोटभरे, रमेश पौळ, मनोहर मुंडे, ज्ञानदेव मुंडे, दत्तात्रय गव्हाणे, पांडुरंग गव्हाणे, प्रकाश मुंडे, प्रभू मुंडे, दत्ता मुंडे, मदन वाघमारे, बाळासाहेब पांडे, रघुनाथ देशमुख, हेमंत लोंढे, देविदास कराड, मुरलीधर नागरगोजे, भगवान बडे, विशाल देशमुख, ब्रह्मानंद देशमुख, अरुण मुंडे आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक साळुंखे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. २१ मार्चपर्यंत सर्व बिले अदा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, ही बिले नेमकी किती रकमेची असतील या बाबत स्पष्टता दिली नाही. जाहीर केल्याप्रमाणे प्रति टन २९५० रुपये सरसकट खात्यात वर्ग होईपर्यंत सत्याग्रह आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

फोटो ओळ :
सिरसाळा, जि. बीड : ओंकार साखर कारखान्याच्या पांगरी युनिट क्रमांक ८ समोर थकीत ऊस बिले देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन. (छायाचित्र : दिगंबर देशमुख)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com