पुरंदर विमानतळ ठरणार फायदेशीर; दर वर्षी येतील 'इतके' प्रवासी!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यास दरवर्षी किमान ७५ लाख ते एक कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज जर्मनीतील डार्स कंपनीने प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यास दरवर्षी किमान ७५ लाख ते एक कोटी प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज जर्मनीतील डार्स कंपनीने प्राथमिक अहवालात म्हटले आहे. हे विमानतळ आर्थिदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असेही अहवालात नमूद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुरंदर येथे २ हजार ४०० हेक्‍टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास केंद्र आणि राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या विमानतळाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम डार्स या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने प्रारूप अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) सादर केला आहे. त्यात या विमानतळाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर दरवर्षी किमान ७५ लाख ते एक कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे हे विमानतळ  आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे अहवालात नमूद केले आहे. तसेच, या अहवालाची सिंगापूर येथील चांगी विमानतळाकडून तपासणी करून घेण्यात आली आहे, असे ‘एमएडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुरंदर विमानतळ विकसित झाल्यानंतर लोहगाव येथील विमानतळावरून होणारी प्रवासी विमानांची उड्डाणे यांना मर्यादा येणार आहे. सध्या लोहगाव विमानतळावरून दरवर्षी ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करतात. पुरंदर विमानतळ विकसित झाल्यानंतर ही प्रवासीसंख्या आणखी वाढणार आहे. यापूर्वी देशात उभारण्यात आलेल्या विमानतळांवर प्रामुख्याने एकच धावपट्टी आहे. पूर्वी विमानांचा आकार मर्यादित असल्यामुळे त्या पद्धतीने धावपट्टी उभारण्यात येत असे. आता एका धावपट्टीमुळे अनेक गोष्टींवर मर्यादा येतात. गेल्या काही वर्षांत जागेच्या वाढलेल्या किमती आणि भूसंपादनात येणारे अडथळे, यामुळे भविष्यात विमानतळावरील धावपट्ट्यांची संख्या वाढविणे, त्यांच्या लांबीत वाढ करणे, अशा बाबी अडचणीच्या ठरतात. या सर्व गोष्टींचा विचार करून पुरंदर विमानतळावर अधिक धावपट्ट्या उभारण्याचा विचार आहे.

दोन धावपट्ट्या उभारणार
प्रवाशांची वाढती संख्या आणि पुणे शहर व आजूबाजूच्या परिसराची गरज लक्षात घेऊन मोठी व लांबपल्ल्याची विमाने उतरणे शक्‍य व्हावे, यासाठी या विमानतळावर किमान चार हजार मीटरच्या दोन धावपट्ट्या उभारण्याचे नियोजन आहे. दोन धावपट्ट्यांमुळे विमानांचे ‘टेक ऑफ’ आणि ‘लॅंडिंग’च्या वेळेत मोठी बचत होईल. तसेच, विमानांची संख्या वाढविणेही शक्‍य होईल.

विमानतळ - वर्षाला प्रवासी
लोहगाव - ६० ते ६५ लाख
पुरंदर - ७५ लाख ते १ कोटी (अंदाजे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one crore passengers can travel annually if the planned international airport at Purandhar is developed